नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ‘घड्याळ’ या निवडणूक चिन्हाचा वापर करण्यास सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सशर्त परवानगी दिली. ‘घड्याळ’ चिन्हाजवळ हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची सूचना नमूद करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले असून कोणत्याही स्थितीत या आदेशाचे पालन झालेच पाहिजे, असेही न्यायालयाने बजावले आहे. हा निर्णय राष्ट्रवादीचे (शरद पवार) नेते शरद पवार यांना धक्का असल्याचे मानले जात आहे.
प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश
न्यायालयाने अजित पवार यांच्या पक्षाला याबाबत नवे प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाने १९ मार्च रोजी दिलेल्या आदेशानुसार, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याच्या सूचनेसह आम्ही निवडणुकीत घड्याळ चिन्हाचा वापर करू, असे प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले आहे. अजित पवार यांच्या पक्षाला निवडणुकीत घड्याळ चिन्हावर निवडणूक लढण्यास मनाई करावी, अशी मागणी करणारी याचिका शरद पवार यांच्या पक्षाने सर्वोच्च न्यायालयात केली होती. ती याचिका गुरुवारी फेटाळण्यात आली.
आक्षेप काय होता?
न्या. सूर्यकांत आणि न्या. उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत २९ ऑक्टोबर रोजी संपणार आहे. तत्पूर्वी याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घ्यावा, असे शरद पवारांच्या पक्षाने म्हटले होते. पक्षाच्या दोन्ही गटांना घड्याळ चिन्हाच्या वापरापासून रोखण्याच्या मागणीसाठी ही याचिका करण्यात आली होती. अजित पवारांच्या पक्षाकडून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन होत नाही, असा आक्षेप शरद पवार पक्षाच्या वकिलांनी घेतला होता.
अटींचे पालन होत नसल्याची तक्रार
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) वकील अभिषेक मनू सिंघवी म्हणाले की, घड्याळ हे चिन्ह कोणत्याही पक्षाला देऊ नये, अशी आमची मागणी होती. मात्र, न्यायालयाने १९ मार्च रोजी आपल्या निर्णयात अजित पवारांच्या पक्षाला हे चिन्ह वापरण्याची परवानगी दिली. त्यासह काही अटी ठेवल्या होत्या. परंतु, अजित पवारांचा पक्ष त्या अटींचे पालन करताना दिसत नाही. तसेच अजित पवारांचा पक्ष शरद पवारांच्या नावाचाही वापर करत आहे, असे स्पष्ट करून सिंघवी यांनी यावेळी न्यायालयासमोर काही छायाचित्रे सादर केली. त्यानंतर अजित पवार गटाचे वकील बलबीरसिंग यांनी, शरद पवार गटाने सर्व छायाचित्रे न्यायालयासमोर सादर केली नसल्याचे सांगितले.