

लोकसभा निवडणूकीनंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणूका लवकरच होणार आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष आपापल्या पदरात जास्तीत जास्त जागा पाडाव्यात, यासाठी प्रयत्नशील आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी महायुतीमध्ये भाजप १५५ जागा, शिवसेना शिंदे गट ६५ जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला ५५ जागा मिळू शकतात, अशी चर्चा माध्यमांमध्ये सुरू होती. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महायुतीत आम्हाला ५५ जागा मिळणार असतील तर आम्ही समाधानी नाही, असं ते म्हणाले. तर जागावाटपाच्या चर्चा मीडियामध्ये नकोत, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले अमोल मिटकरी?
महायुतीतील जागावाटपाबद्दल बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी म्हणाले की, "महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष असं म्हणतात की, आम्ही १००-१०० जागा लढवू. पण मतदारसंघ मात्र २८८ आहेत . डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार दिलाय. त्यामुळं मला असं वाटतंय, जर १००चं ताणून धरलं, तर वेगळचं लढावं लागेल. आम्हाला महायुतीत जर ५५ जागाच मिळत असतील, तर त्यात आम्ही समाधानी असू असं आम्हाला वाटत नाही आणि आम्ही समाधानी राहायला पण नाही पाहिजे."
लहान भावांना सांभाळून ठेवू: चंद्रशेखर बावनकुळे
अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "केंद्रात मोदीजींचं सरकार आहे. मोदीजी आमचे देशाचे नेते आहेत. त्यामुळं भारतीय जनता पार्टी मोठ्या भावाच्या भूमिकेतून लहान भावांना सांभाळून ठेवण्याच्याच भूमिकेत आहे. माझी एकनाथ शिंदे आणि अजित दादांच्या टीमला एक विनंती आहे की, कुठल्याही जागेची चर्चा मीडियात होऊ शकत नाही."
रोहित पवारांनी महायुतीला डिवचलं...
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महायुतीला डिवचलं आहे. ते म्हणाले की, "महायुतीत २०० जागा भाजप घेणार आहे. बाकीच्या ८८ जागांमध्ये शिंदे गट आणि अजित पवार गट, तसेच इतर पक्ष असतील. अजित पवार गटाला २०-२२ जागा, तर शिंदे गटाला ३०-४० जागा मिळू शकतील आणि उरलेल्या जागा मित्रपक्षांना मिळतील असं बोललं जातंय. पण काहीही झालं तरी भाजप २०० पेक्षा कमी जागा लढवणार नाही."