राष्ट्रवादी अजित पवार गट विधानसभेच्या ८५ ते ९० जागा लढवणार? प्रफुल पटेलांनी काय केला दावा? शरद पवारांनाही लगावला टोला

भुजबळ साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आमची ८५ ते ९० जागा मागायची तयारी आहे,असं प्रफुल पटेल म्हणाले.
प्रफुल पटेल
प्रफुल पटेलसंग्रहित फोटो

मुंबई: लोकसभा निवडणूकीनंतर आता महाराष्ट्रात विधासभा निवडणूक येऊ घातली आहे. महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणूकीवर लक्ष केंद्रीत केलं आहे. दरम्यान महायुतीतील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं विधानसभा निवडणूकीची तयारी सुरु केली आहे. विधानसभेसाठी अजित पवार गट ८५ ते ९० जागा मागण्याचा विचार करत असून आमची ९० जागांवर लढण्याची तयारी असल्याचं प्रफुल पटेल म्हणाले. तीन पक्षांचं सरकार असल्यामुळं आम्ही सर्व जागा मागू शकत नाही. छगन भुजबळ यांनी म्हटल्याप्रमाणे आमची ८५-९० जागा लढवण्याची तयारी आहे, असं ते म्हणाले.

नेमकं काय म्हटले प्रफुल पटेल?

"आमचे आमदार आणि आमचे सहकारी आमदार, जे आमच्यासोबत पहिल्यापासून राहिलेत त्यांची संख्या ५७ होते. त्याच्यापलीकडे जाऊन जास्तीक जास्त आम्हाला कशा मिळवता येतील, ही आमची प्राथमिकता आहे. तीन पक्षांमध्ये कशी अडजस्टमेंट होते, ते पाहावं लागेल. भुजबळ साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आमची ८५ ते ९० जागा मागायची तयारी आहे," असं प्रफुल पटेल म्हणाले.

शरद पवारांना लगावला टोला-

अजित पवारांसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्व दरवाजे बंद झाल्याचं विधान शरद पवार यांनी केलं होते. यावर प्रफुल पटेल यांनी टोला लगावला. राजकारणात अनेक गोष्टी घडत असतात, मात्र ज्याप्रमाणे शरद पवार शिवसेनेसोबत आले, हेसुद्धा एक आश्चर्यच होतं, असं म्हणत प्रफुल पटेल यांनी दिली.

प्रफुल पटेल म्हणाले की, "राजकारणामध्ये अनेक गोष्टी घडतात. अनेक नेते काहीना काही बोलत असतात. अनेक वर्षानुवर्षे आम्ही वेगवेगळ्या भुमिकांमध्ये आम्ही राहिलो आहोत. शिवसेना आणि पवार साहेब एकत्र येणार हेही आश्चर्यच होतं."

logo
marathi.freepressjournal.in