अजितदादा सुसाट! पक्षाच्या संभाव्य २० उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब, बघा लिस्ट

राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत दमदार यश मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, राष्ट्रवादी अजितदादा गटाने यामध्ये आघाडी घेतली आहे. महायुतीतील जागावाटपाचा तिढा कधी सुटेल तेव्हा सुटेल, पण त्यापूर्वीच अजितदादा गटाने पक्षाच्या संभाव्य २० उमेदवारांच्या नावावर आपल्यापरीने शिक्कामोर्तब केले आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत दमदार यश मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, राष्ट्रवादी अजितदादा गटाने यामध्ये आघाडी घेतली आहे. महायुतीतील जागावाटपाचा तिढा कधी सुटेल तेव्हा सुटेल, पण त्यापूर्वीच अजितदादा गटाने पक्षाच्या संभाव्य २० उमेदवारांच्या नावावर आपल्यापरीने शिक्कामोर्तब केले आहे.

यामध्ये बारामतीतून अजित पवार, तर येवले मतदारसंघातून छगन भुजबळ निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे समजते. दरम्यान, अद्याप जागावाटपाचा कोणताही निर्णय जाहीर झालेला नसून लवकरच जागावाटप जाहीर करण्यात येईल, असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी सांगितले.

आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीविरोधात महायुती अशी लढत रंगणार आहे. यात भाजप वगळता दोन राष्ट्रवादी काँग्रेस आणि दोन शिवसेना आमनेसामने निवडणुकीच्या रिंगणात आपले नशीब आजमावणार आहेत. त्यामुळे कोणत्या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत महायुती व मविआकडून चाचपणी सुरू आहे.

सध्या महायुती व मविआच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. महायुतीचे जागावाटप जाहीर झालेले नसताना आता अजित पवार गटाच्या संभाव्य २० उमेदवारांची यादी समोर आली आहे. अजित पवार गटाची नुकतीच पक्षांतर्गत बैठक पार पडली. या बैठकीला अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या संभाव्य २० उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या उमेदवारांच्या नावांची यादीही समोर आली आहे. यानुसार बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार निवडणूक लढवणार असून बीड, परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे हे रिंगणात उतरणार असल्याचे सांगण्यात येते.

संभाव्य २० उमेदवार व मतदारसंघांची नावे

बारामती - अजित पवार

येवला - छगन भुजबळ

आंबेगाव - दिलीप वळसे-पाटील

परळी - धनंजय मुंडे

कागल- हसन मुश्रीफ

दिंडोरी - नरहरी झिरवळ

रायगड - अदिती तटकरे

अहमदनगर - संग्राम जगताप

खेड - दिलीप मोहिते-पाटील

अहेरी - बाबा अत्राम

कळवण - नितीन पवार

इंदापूर – दत्ता भरणे

उदगीर - संजय बनसोडे

पुसद - इंद्रनील नाईक

वाई, खंडाळा, महाबळेश्वर - मकरंद आबा पाटील

पिंपरी - अण्णा बनसोडे

मावळ - सुनील शेळके

अमळनेर - अनिल पाटील

जुन्नर - अतुल बेनके

वडगाव-शेरी - सुनील टिंगरे

बावनकुळेंकडून आक्षेप

राष्ट्रवादी काँग्रेसच्या २५ जागा निश्चित झाल्याच्या वृत्तावर बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, कुणाच्याही जागांचा निर्णय अजून झालेला नाही. महायुतीमध्ये बोलणी सुरू आहेत. तिन्ही पक्षांचे नेते एकत्रित पत्रकार परिषद घेईपर्यंत अंतिम यादी समजू नये. जागावाटप करताना मेरीट हाच निकष राहील.

logo
marathi.freepressjournal.in