"वाघ लय आवडतो, पण जेव्हा तो सर्कशीत रिंगमास्टरच्या इशाऱ्यावर...", नाव न घेता अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर घणाघात

"या वाघाच्या डरकाळीनं भल्याभल्यांचा थरकाप उडत होता. आज त्याला पिंजऱ्याच्या आडून गुरगुरावं लागतं"
"वाघ लय आवडतो, पण जेव्हा तो सर्कशीत रिंगमास्टरच्या इशाऱ्यावर...", नाव न घेता अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर घणाघात

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे खासदार अमोल कोल्हे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर थेट बारामतीमधूनच निशाणा साधला. शुक्रवारी बारामती येथे शेतकरी आक्रोश मोर्चाच्या सभेला संबोधित करत असताना कोल्हे यांनी नाव न घेता अजित पवारांवर बोचरी टीका केली.

“वाघ जंगलात फिरताना आपल्याला राजा वाटतो. पण, सर्कशीत रिंगमास्टरच्या इशाऱ्यावर कसरती करताना आपल्या काळजाला वेदना होतात,” असे म्हणत अप्रत्यक्षपणे कोल्हेंनी अजित पवारांवर हल्लाबोल केला.

नेमके काय म्हणाले?

"वाघ आपल्याला लय आवडतो. वाघ जेव्हा जंगलात फिरत असतो तेव्हा तो आपल्याला जंगलाचा राजा वाटतो. पण, सर्कशीत रिंगमास्टरच्या इशाऱ्यावर वाघ कसरती करतो तेव्हा काळजाला वेदना होतात. कारण ज्या वाघावर मी जीवापाड प्रेम केले त्याला आज रिंगमास्टरच्या इशाऱ्यावर चालावं लागतं. जेव्हा हाच वाघ पिंजऱ्यात उभं राहिलेला बघतो तेव्हा आणखी काळजाला वेदना होतात. कारण या वाघाच्या डरकाळीनं भल्याभल्यांचा थरकाप उडत होता. आज त्याला पिंजऱ्याच्या आडून गुरगुरावं लागतं. कुणीही येणारे जाणारे त्याला दगड मारू शकते ही भावना जेव्हा वाघाची होते. असेच महाराष्ट्राच्या हितासाठी वाघाची डरकाळी फोडणारे जेव्हा दिल्लीच्या इशाऱ्यावर तोंडातून शब्द काढत नाहीत तेव्हा ही भावना नक्कीच जागी होते", असे कोल्हे अजित पवारांचे नाव न घेता म्हणाले.

दरम्यान, ज्या मातीने संपूर्ण देशाला भूषण वाटावा असा रत्न (शरद पवार) दिला, त्या बारामतीच्या मातीसमोर मी नतमस्तक होतो आणि उरलेले पुण्याच्या सभेत दिलखुलास बोलेन, असे म्हणत शेतकऱ्यांचा आक्रोश ऐकण्यासाठी पुण्यातील सभेला उपस्थित राहण्याचे आवाहनही कोल्हे यांनी केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in