

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे हेच पक्षाचे कामकाज पाहत असून, त्यांच्या पदांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक यांनी शनिवारी मुंबईतील एका पत्रकार परिषदेत दिले.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या कार्यसमितीच्या कागदपत्रांमध्ये या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांच्या पदांचा उल्लेख नसल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. तसेच, दिल्लीतील पक्ष मुख्यालयात या दोन्ही नेत्यांना स्वतंत्र कार्यालयीन जागा वापरण्यास मज्जाव केल्याचे वृत्त काही माध्यमांमध्ये आले होते. हे वृत्त पूर्णपणे तथ्यहीन आणि निराधार असल्याचे आदिक यांनी स्पष्ट केले.
'या खोट्या वृत्तामुळे आमच्या ज्येष्ठ नेत्यांची आणि पक्षाची नाहक बदनामी झाली आहे. आम्ही याप्रकरणी कायदेशीर सल्ला घेत असून, येत्या सोमवारपर्यंत संबंधित माध्यमांविरुद्ध अनुकुसानीचा खटला दाखल करणार आहोत', असे आदिक यांनी सांगितले.