"देशाच्या अर्थव्यवस्थेची खरी परिस्थिती समोर येऊ नये म्हणून पहिल्यांदाच...", अंतरिम बजेटवर जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया

हे अंतरिम बजेट म्हणजे निव्वळ धूळफेक आहे. देशातील बेरोजगारी आणि महागाई कमी करण्यासाठी कोणतीही उपाययोजना या अर्थसंकल्पात नाही.
"देशाच्या अर्थव्यवस्थेची खरी परिस्थिती समोर येऊ नये म्हणून पहिल्यांदाच...", अंतरिम बजेटवर जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया
संग्रहित छायाचित्र

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (१ फेब्रुवारी) अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. मात्र, टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल केला नसल्यामुळे सामान्य करदात्यांच्या पदरी पुन्हा निराशा पडली. तथापि, यावर्षी पहिल्यांदाच देशाचा आर्थिक पाहणी अहवाल न मांडल्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नेते जयंत पाटील यांनी टिकास्त्र सोडले आहे.

निराशाजनक, नकारात्मक आणि नाविन्य नसलेला अर्थसंकल्प

हे अंतरिम बजेट म्हणजे निव्वळ धूळफेक आहे. देशातील बेरोजगारी आणि महागाई कमी करण्यासाठी कोणतीही उपाययोजना या अर्थसंकल्पात नाही. या बजेटमध्ये देशातील दलित आणि आदिवासींसाठी नक्की काय आहे, असा प्रश्न मला पडतो, असे म्हणत निराशाजनक, नकारात्मक आणि नाविन्य नसलेला हा अर्थसंकल्प आहे, अशा शब्दांत पाटील यांनी अर्थसंकल्पाचे वर्णन केले.

...म्हणून आर्थिक पाहणी अहवाल मांडला नाही

पुढे बोलताना, प्राप्तिकर स्लॅबमध्येही कोणते बदल या अर्थसंकल्पात केले गेलेले नाहीत. देशाच्या अर्थव्यवस्थेची खरी परिस्थिती समोर येऊ नये म्हणूनच बहुधा यावर्षी पहिल्यांदाच देशाचा आर्थिक पाहणी अहवाल मांडला गेलेला नाही, असे पाटील म्हणाले. निर्मला सीतारमन यांनी अर्थसंकल्पात सर्वाधिक वेळा पंतप्रधानांचा उल्लेख केला, असेही पाटील यांनी नमूद केले.

दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या कार्यकाळातील हा सहावा अर्थसंकल्प होता. यावेळी अर्थमंत्र्यांनी सुमारे तासभर भाषण केले.

logo
marathi.freepressjournal.in