Maharashtra Assembly Elections 2024: जागावाटपापूर्वीच अजितदादांनी १७ जणांना दिले ‘एबी फॉर्म’

महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झाला नसला तरी या सर्वांच्या पुढे जात अजित पवार यांनी विद्यमान १७ उमेदवारांना थेट ‘एबी फॉर्म’चेच वाटप केले आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : जागावाटपात महायुतीत अजित पवार गट सर्वात छोटा भाऊ ठरणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यागाची भूमिका घेण्याची विनंती अजित पवार यांना केली होती. महायुतीतील मोठा भाऊ भाजपने रविवारी ९९ उमेदवारांची यादी जारी केली. महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झाला नसला तरी या सर्वांच्या पुढे जात अजित पवार यांनी विद्यमान १७ उमेदवारांना थेट ‘एबी फॉर्म’चेच वाटप केले आहे. अजित पवारांच्या ‘देवगिरी’ बंगल्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांची मोठी गर्दी झाली असून आतापर्यंत १७ उमेदवारांना ‘एबी फॉर्म’चे वाटप करण्यात आले आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून मंगळवारपासून निवडणुकीसाठी अर्ज करता येणार आहे. २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यामुळे जागावाटपाचा मुहूर्त लागेपर्यंत न थांबता अजित पवार यांनी आपल्या नेत्यांना ‘एबी फॉर्म’ वाटण्यास सुरुवात केली आहे.

उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख जवळ येत असल्यामुळे अजित पवार यांनी ‘एबी फॉर्म’चे वाटप सुरू केले आहे. या सर्व हालचालींवरून अजित पवार गटाची पहिली यादी मंगळवारी जाहीर होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये असलेल्या भरत गावित यांनाही ‘एबी फॉर्म’ देण्यात आला आहे. नवापूर मतदारसंघातून ते नशीब आजमावणार आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला होता. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून लढलेल्या भरत गावित यांचा काँग्रेसच्या शिरीष कुमार नाईक यांनी पराभव केला होता.

विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्याच्या संशयावरून काँग्रेसच्या रडारवर असलेल्या हिरामण खोसकर यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांनाही ‘एबी फॉर्म’ मिळाला आहे. विजय आमचाच होणार, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यांना मिळाले ‘एबी फॉर्म’

राजेश विटेकर, संजय बनसोडे, चेतन तुपे, सुनील टिंगरे, दिलीप वळसे-पाटील, दौलत दरोडा, राजेश पाटील, दत्तात्रय भरणे, आशुतोष काळे, हिरामण खोसकर, नरहरी झिरवळ, छगन भुजबळ, भरत गावित, बाबासाहेब पाटील, अतुल बेनके.

logo
marathi.freepressjournal.in