भुजबळांना दिल्लीचे आशीर्वाद? जागावाटप ठरण्याआधीच दंड थोपटले; हेमंत गोडसेंचाही दावा

भुजबळांना दिल्लीचे आशीर्वाद? जागावाटप ठरण्याआधीच दंड थोपटले; हेमंत गोडसेंचाही दावा

महाविकास आघाडीत नाशिकची जागा ठाकरे गटाला सुटली असून, त्यांनी थेट सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे इच्छुक विजय करंजकर यांची नाराजी ओढवून घेतली गेली.

विशेष प्रतिनिधी/मुंबई

महायुतीत जागावाटपाचा वाद अजूनही सुटलेला नाही. एकीकडे सिंधुदुर्ग-रत्नागिरीवरून धुसफूस सुरू असतानाच, नाशिकमध्ये राष्ट्रवादीने अधिक जोर लावला आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी कोणत्याही परिस्थितीत मैदानात उतरायचेच, असा निर्धार बोलून दाखविला असून, आपल्याला दिल्लीचे आशीर्वाद असल्याचे म्हटले आहे. अर्थात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीत बोलणी केली असल्याचे म्हटले असून, आता त्यांनी थेट लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. दुसरीकडे शिंदे गटाचे नेते, विद्यमान खासदार हेमंत गोडसे या जागेवरील दावा सोडायला तयार नाहीत. त्यामुळे या जागेवरून जोरात खल सुरू आहे.

महाविकास आघाडीत नाशिकची जागा ठाकरे गटाला सुटली असून, त्यांनी थेट सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे इच्छुक विजय करंजकर यांची नाराजी ओढवून घेतली गेली. परंतु त्यांची समजूत काढण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न आहे. त्यामुळे ठाकरे गटाची शिवसेना नाशिकमध्ये कामाला लागली असून, प्रत्येक भाग पिंजून काढण्याचे काम सुरू आहे. परंतु महायुतीत अजूनही ही जागा कोणाच्या वाट्याला जाणार, हेच ठरलेले नाही. यामध्ये आधी भाजपच्या दिनकर पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत माघार नाही, अशी भूमिका घेत तयारी दर्शविली होती. मात्र, विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी शिंदे गटाच्या वतीने चांगलाच जोर लावला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दबावही वाढविला.

परंतु अजूनही येथे उमेदवारी निश्चित झालेली नाही. एकीकडे शिंदे गट आणि दुसरीकडे भाजपने जोर लावल्याने आता ही जागा राष्ट्रवादीला देण्याचा घाट घातला. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. त्यातच त्यांना कमळ चिन्हावर निवडणूक लढण्याची गळ घातली जात असल्याचेही बोलले जात आहे. परंतु छगन भुजबळ कमळावर निवडणूक लढणे अशक्य असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. नाशिकमधून छगन भुजबळ यांना उतरविण्याचा निर्णय दिल्लीत झाला आहे. मला उपमुख्यंत्री अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी निवडणुकीच्या तयारीला लागण्याचा निरोप दिला आहे. त्यामुळे आता मी नाशिकमधून रणशिंग फुंकले आहे, असे भुजबळ म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in