२० मेपूर्वी तरी उमेदवारी घोषित करा; भुजबळांची नाराजी, गोडसेंचे श्रीरामाला साकडे

नाशिकमध्ये शिंदे गटाचे हेमंत गोडसे हे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे या जागेवर खऱ्या अर्थाने त्यांचाच दावा आहे. परंतु त्यांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध आहे.
२० मेपूर्वी तरी उमेदवारी घोषित करा; भुजबळांची नाराजी, गोडसेंचे श्रीरामाला साकडे

विशेष प्रतिनिधी/मुंबई

महायुतीत नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराचा तिढा अद्याप सुटलेला नाही. या जागेवर भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचा दावा आहे. त्यामुळे जागावाटपाचा तिढा सुटता सुटेना, अशी अवस्था झाली आहे. त्यावर आता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आता किमान २० मेच्या आधी तर निर्णय घ्यावा. कारण २० मेचा मूहुर्त आहे, असे म्हणत महायुतीच्या नेत्यांना टोला लगावला, तर शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांनी रामनवमीनिमित्त काळाराम मंदिरात श्रीरामाचे दर्शन घेऊन लवकर उमेदवारी जाहीर करावी आणि या निवडणुकीत विजय प्राप्त व्हावा, असे साकडे घातले.

नाशिकमध्ये शिंदे गटाचे हेमंत गोडसे हे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे या जागेवर खऱ्या अर्थाने त्यांचाच दावा आहे. परंतु त्यांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध आहे. त्यांच्यावर यावेळी प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे ही जागा धोक्यात असल्याचे सांगत हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यास भाजपचा विरोध आहे. भाजपचे दिनकर पाटील निवडणूक लढण्यास तयार आहेत. तसेच राष्ट्रवादीच्या वतीने छगन भुजबळ यांनीही तयारी सुरू केलेली आहे. मात्र, ही जागा नेमकी कोणाला सुटते, हे अद्याप निश्चित नाही. त्यामुळे छगन भुजबळ यांनी आज उमेदवारी घोषित करण्यावरून महायुतीच्या नेत्यांना टोला लगावला.

नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीने ज्यांना उमेदवारी द्यायची आहे, त्यांना जाहीर करून टाका. आता नाही जमले तर किमान २० मेअगोदर तरी जाहीर करा. कारण २० मे हा मुहूर्त आहे. त्यामुळे उमेदवारी लवकर घोषित झाली तर बरे होईल, असा टोला त्यांनी लगावला. श्रीराम नवमीनिमित्त नाशिकच्या काळाराम मंदिरात आज महायुतीचे इच्छुक उमेदवार आणि महाविकास आघाडीचे नेते दर्शनासाठी आले होते. यादरम्यान छगन भुजबळ आणि शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांचीही भेट झाली. यावेळी गोडसे यांनी भुजबळांना पाया पडून नमस्कार केला. तेव्हा भुजबळांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान, गोडसे यांनी श्रीरामाचे दर्शन घेतल्यानंतर लवकरात लवकर मला लोकसभेची उमेदवारी मिळावी आणि या निवडणुकीत विजयी करावे, असे साकडे घातले.

राष्ट्रवादीचा दावा मजबूत

राष्ट्रवादी काँग्रेसने सातारा किंवा नाशिक लोकसभा मतदारसंघ सोडावा, अशी मागणी केली होती. यामध्ये महायुतीत साताऱ्याची जागा भाजपला सुटली आहे. त्यामुळे नाशिक लोकसभेचा राष्ट्रवादीचा दावा मजबूत झाला आहे. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीला सुटू शकते, अशी चर्चा आहे. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकची जागा सहजासहजी सोडायला तयार होणार नाहीत. त्यामुळे या जागेवरून वाद होण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in