रोहित पवारांची ९ तास ईडीकडून चौकशी

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची गुरुवारी सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी तब्बल ९ तास चौकशी केली.
रोहित पवारांची ९ तास ईडीकडून चौकशी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची गुरुवारी सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी तब्बल ९ तास चौकशी केली. दुपारी १२ वाजताच्या सुमारास ते ईडीच्या बॅलार्ड पीअर येथील कार्यालयात दाखल झाले होते. त्यानंतर रात्री ९.१५ च्या सुमारास ते ईडीच्या कार्यालयाबाहेर आले. त्यांना ८ फेब्रुवारीला पुन्हा चौकशीला बोलावण्यात आले आहे.

बारामती ॲग्रो कथित गैरव्यवहारप्रकरणी रोहित पवारांची ही चौकशी करण्यात आली. रोहित पवारांच्या या चौकशीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून केंद्र सरकारविरोधात राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती कार्यालय आणि तहसील कार्यालय या ठिकाणी घंटानाद करण्यात आला. विशेष म्हणजे, यापूर्वी २५ जानेवारी रोजी ईडीच्या रोहित पवारांची तब्बल १२ तास चौकशी केली होती.

रोहित पवार गुरुवारी ईडी कार्यालयात चौकशीला जाण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयात आले. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. विशेष म्हणजे रोहित पवार यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या आजी आणि शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार या स्वत: राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात आल्या. प्रतिभा पवार दिवसभर रोहित पवार यांची ईडी चौकशी पूर्ण होईपर्यंत राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात होत्या. तसेच रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार हेदेखील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात ठाण मांडून बसणार आहेत. रोहितच्या पत्नी कुंती पवार आणि बहीण रेवती सुळे यादेखील प्रदेश कार्यालयात उपस्थित होत्या.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in