मुंबई : महायुती सरकारमध्ये सध्या काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेना शिंदे गटाचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांबाबत केलेल्या वक्तव्याने अजित पवार गट नाराज झाला असून त्यांनी तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळातून हटवा, अन्यथा आम्ही सरकारमधून बाहेर पडणे पसंत करू, असा इशारा मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस हे राज्यातील सत्ताधारी महायुती आघाडीत भागीदार आहेत. मात्र, त्यांच्यात सध्या अनेक मुद्द्यांवरून वादावादी होत असल्याचे दिसून येत आहे. राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीने महायुतीत वेगळी भूमिका घेतल्याने आधीच राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या असताना आता शिंदे गट व अजितदादा गटात साठमारी सुरू झाल्याने महायुतीत तणातणी सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.
सावंत यांना हटवा, अन्यथा सरकारमधून बाहेर पडू - राष्ट्रवादी
अशी विधाने ऐकण्यापेक्षा युती सोडणे चांगले आहे. आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना विनंती आहे की, आम्ही अशी विधाने ऐकण्याऐवजी महायुतीतून बाहेर पडणे चांगले. एकतर तानाजी सावंत यांची हकालपट्टी झाली पाहिजे किंवा आपण युतीतून बाहेर पडले पाहिजे, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांनीही सावंत यांच्या वक्तव्याचा निषेध केला आणि युती अबाधित राखणे ही केवळ त्यांच्या पक्षाची जबाबदारी आहे का, असा सवाल केला. सावंत यांनी यापूर्वीही अशी वक्तव्ये केली आहेत, ज्यामुळे राष्ट्रवादी दुखावली गेली आहे, असे ते म्हणाले. आम्ही केवळ युतीचा धर्म राखण्यासाठी गप्प आहोत, असे मिटकरी यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांशेजारी बसल्यानंतर उलट्या होतात - तानाजी सावंत
महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांशेजारी आपण बसतो, मात्र बाहेर आल्यानंतर आपल्याला उलट्या होतात, असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांनी धाराशिव येथे गुरुवारी एका कार्यक्रमात बोलताना केले. त्यांनी स्वतःला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (एनसीपी) नेत्यांशी कधीही जुळवून न घेणारा 'कट्टर शिवसैनिक' म्हटले आहे.
अजितदादांनी जागे व्हावे - शरद पवार गट
अजित पवारांनी जागे होऊन कॉफीचा वास घेण्याची हीच वेळ आहे, असे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रॅस्टो म्हणाले की, सावंत यांच्या वक्तव्यावरून असे दिसून येते की, महायुतीला आता राष्ट्रवादीची गरज नाही.
शिंदे गटाची सारवासारव
मंत्री तानाजी सावंत यांच्या वक्तव्यावर शिवसेना शिंदे गटाने खुलासा केला असून, तानाजी सावंत यांच्या वक्तव्याशी पक्षाचा काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले की, सावंत यांच्या वक्तव्याशी आमचा पक्ष सहमत नाही.