
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कोणताही प्रभाव पाडू न शकणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला जळगाव जिल्ह्यात लवकरच मोठा हादरा बसणार आहे. जिल्ह्यातील दोन माजी मंत्र्यांसह काही बडे नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात दाखल होणार आहेत. यामुळे जिल्ह्यात अजित पवार गटाची ताकद वाढणार असल्याने शरद पवार गटात अस्वस्थता पसरली आहे.
कोण-कोण सोडणार साथ?
माजी मंत्री डॉ. सतीश पाटील आणि गुलाबराव देवकर तसेच माजी आमदार कैलास पाटील व दिलीप वाघ हे अजित पवार गटात जाणार असल्याचं समजतंय. अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी पुढाकार घेत हा प्रवेश सुकर केल्याचे सांगण्यात येते. शनिवारी हा पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला आहे. महिला नेत्या तिलोत्तमा पाटील देखील देवकरांसोबत अजित पवार गटात जाण्याच्या वाटेवर आहेत. याशिवाय, माजी आमदार दिलीप सोनवणे देखील साथ सोडू शकतात.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे माजी मंत्री पारोळयाचे डॉ. सतीश पाटील यांचे अजित पवार यांच्याशी संबंध चांगले असल्याने अजित पवार गटात जाण्यासाठी ते उत्सुक आहे. तसेच माजी मंत्री गुलाबराव देवकर हे देखील अजित पवार गटात येण्यासाठी उत्सुक आहेत. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील एक आक्रमक चेहरा म्हणून डॉ. सतीश पाटील यांच्याकडे पाहिले जाते तर गुलाबराव देवकर यांच्याकडे संघटन कौशल्य आहे.
गुलाबराव देवकर यांनी शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, त्यात देवकरांना पराभव पत्करावा लागला होता. निवडणूक प्रचारात देवकरांनी गुलाबराव पाटलांवर केलेले आरोप पाटलांना चांगलेच झोंबल्यामुळे गुलाबराव पाटील यांचा देवकरांना अजित पवार गटात घेण्याबाबत विरोध केला होता. काही अजित पवार गटाच्या जिल्ह्यातील नेत्यांनी देखील विरोध दर्शवल्यामुळे देवकरांचा अजित पवार गटात दाखल होण्याचा प्रवेश सोहळा लांबला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी काही दिवसांपूर्वी याबाबत संकेत दिले होते. २००९ मध्ये जिल्ह्यात भाजप पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद होती. दोन मंत्रीसह पाच आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे होते. शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग या जिल्ह्यात होता, असे असले तरी २०१४ मध्ये मोदी लाटेत ही स्थिती बदलली आणि २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विभाजन झाल्यानंतर या पक्षाचे अस्तित्वच धोक्यात आले. आज जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अस्तित्व असले तरी हा पक्ष दिशाहीन झालेला आहे. पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत. विरोधी पक्षात हा गट असल्याने कार्यकर्त्यांची कामे होत नाहीत, त्यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत. या उलट राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सत्तेत असल्याने कार्यकत्यांची कामे मोठ्या प्रमाणात जलद पद्धतीने होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. दरम्यान डॉ. सतीश पाटील सध्या पारोळा-एरंडोल तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांना विश्वासात घेण्याचे काम करत आहेत. यामुळे शरद पवार गट हादरल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.