मुंबई : महिलांवरील गुन्ह्यांबाबतच्या महाराष्ट्रातील शक्ती विधेयकाला मंजुरी मिळण्यास विलंब होत असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार गट) कार्यकर्त्यांनी मंगळवारी आंदोलन केले.पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत राज्य सचिवालयाजवळ आंदोलन केले. यावेळी सदर विधेयक तयार करणारे तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख हेही उपस्थित होते.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या शताब्दी सोहळ्याला संबोधित करण्यासाठी अध्यक्षा द्रौपदी मुर्मू मुंबईत असतानाच तेथून जवळच असलेल्या राज्य सचिवालयानजीकच्या महात्मा गांधीच्या पुतळ्याजवळ पक्षाच्या महिला काऱ्यकर्त्यांनी निदर्शने केली.
डिसेंबर २०२१ मध्ये राज्य विधानसभेने महिला आणि मुलांवरील गुन्ह्यांवर (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, २०२० एकमताने मंजूर केले होते. यात बलात्कारासाठी मृत्युदंडाची तरतूद आहे आणि महिलांवर ॲसिड हल्ले आणि मुलांवर लैंगिक अत्याचार झाल्यास किमान शिक्षेचे प्रमाण वाढवले आहे. तक्रार नोंदवल्याच्या दिवसापासून तपास पूर्ण करण्यासाठी ३० दिवसांची मुदत विधेयकात दिली आहे.
खासदार सुळे यांनी सांगितले की, विधेयकाला संमती देण्यास झालेल्या विलंबामुळे महाराष्ट्रातील नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. विशेषत: महिला आणि मुलांवरील वाढत्या हिंसाचाराच्या घटना लक्षात घेता हे विधेयक तातडीने मंजूर होणे आवश्यक आहे.
कार्यकर्त्यांनी ‘महिलांच्या सुरक्षेची हमी हवी, शक्ती विधेयक हवे’ असे फलक निदर्शनाच्या वेळी झळकवले.
शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी अलीकडेच राष्ट्रपती मुर्मू यांना हे विधेयक त्वरित संमती करण्यासाठी पत्र लिहिले आहे.