राज्यमंत्रीपद स्वीकारण्यास राष्ट्रवादीचा नकार; आमची थांबण्याची तयारी - अजित पवार

रेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता होती. पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचे नावही त्यासाठी निश्चित झाले होते. मात्र, संख्याबळानुसार राष्ट्रवादीला राज्यमंत्री, स्वतंत्र प्रभार हे खाते ऑफर झाले.
राज्यमंत्रीपद स्वीकारण्यास राष्ट्रवादीचा नकार; आमची थांबण्याची तयारी - अजित पवार

मुंबई : नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता होती. पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचे नावही त्यासाठी निश्चित झाले होते. मात्र, संख्याबळानुसार राष्ट्रवादीला राज्यमंत्री, स्वतंत्र प्रभार हे खाते ऑफर झाले. पण प्रफुल्ल पटेल यांनी याआधी कॅबिनेट मंत्रिपद भूषविले असल्याने राष्ट्रवादीने सध्या तरी हे मंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिला आहे. भविष्यात याबाबतचा विचार करण्यास भाजपला सांगण्यात आले आहे. आमची थांबण्याची तयारी आहे. तसेच आम्ही पूर्णपणे रालोआसोबतच असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

लोकसभा निवडणुकीत फारसे यश न मिळाल्याने राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळ समावेशाबाबत बरीच उत्सुकता होती. राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावाची चर्चा होती. शेवटी ज्येष्ठ नेते म्हणून प्रफुल्ल पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तबही झाले होते. मात्र, मंत्रिपद वाटपाचा फॉर्म्युला ठरविताना संख्याबळाचा विचार करण्यात आला. राष्ट्रवादीचे सुनील तटकरे हे एकमेव खासदार निवडून आले आहेत. रालोआत इतरही अनेक असे घटक पक्ष आहेत की ज्यांचे एक खासदार निवडून आले आहेत. त्यामुळे मंत्रिपद वाटप करताना अडचण आली असती. त्यामुळे राष्ट्रवादीला एका राज्यमंत्रीपदाची (स्वतंत्र प्रभार) ऑफर देण्यात आली होती.

‘आम्ही प्रफुल्ल पटेल यांचे नाव मंत्रिपदासाठी निश्चित केले होते. प्रफुल्ल पटेल हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी याआधी कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिले आहे. त्यांना राज्यमंत्रीपद देणे आम्हाला योग्य वाटले नाही. त्यामुळे आम्ही सांगितले की कॅबिनेट मंत्रिपद मिळत नसेल तर आमची थांबायची तयारी आहे. भविष्यात त्याचा विचार करू. दुसरे काहीही आमच्या मनात नाही. आम्ही रालोआसोबतच आहोत, असे अजित पवार म्हणाले.

आघाडीच्या मंत्रिमंडळात विशिष्ट फॉर्म्युला - फडणवीस

राष्ट्रवादीला एक राज्यमंत्रीपद, स्वतंत्र प्रभार अशी ऑफर देण्यात आली होती, पण राष्ट्रवादीला प्रफुल्ल पटेल यांना मंत्रिपद द्यायचे होते. प्रफुल्ल पटेल हे आधी कॅबिनेट मंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांना राज्यमंत्रीपद देणे राष्ट्रवादीला योग्य वाटले नाही. म्हणून त्यांनी यावेळी नकार दिला आहे. आघाडीच्या मंत्रिमंडळात एक विशिष्ट असा फॉर्म्युला ठरलेला असतो. त्याला अपवाद करता येत नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in