पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र? लवकरच घोषणा होण्याची शक्यता

एकीकडे ठाकरे बंधू एकत्र आले असताना, आता पुण्यातही पवार कुटुंब एकत्र येणार असल्याचे पाहायला मिळणार आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

पुणे : एकीकडे ठाकरे बंधू एकत्र आले असताना, आता पुण्यातही पवार कुटुंब एकत्र येणार असल्याचे पाहायला मिळणार आहे. येत्या दोन दिवसांत एकत्र निवडणूक लढवण्याबाबत मी स्वतः खुलासा करेन असे स्वतः अजित पवारांनी कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले आहे.

शरद पवारांविरोधात बंड पुकारून पक्ष फोडणारे अजित पवार आता पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवारांसह आघाडीत जाण्याची शक्यता आहे. तसे संकेत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष सुभाष जगताप यांनी दिले. या घडामोडींनंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. मात्र प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिलेला नाही, असे राष्ट्रवादी श.प. चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले असून अद्याप माझ्यापर्यंत कोणताही राजीनामा आला नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

२५ किंवा २६ डिसेंबर रोजी दोन्ही राष्ट्रवादीच्या अधिकृत युतीची घोषणा करण्याची शक्यता आहे. तसेच, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, २६ तारखेला सगळ्या गोष्टी समोर येतील. कोण काय बोलते यावर विश्वास ठेवू नका, असेही अजित पवारांनी कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले. यासंदर्भाने आज अजित पवार मुंबईत आढावा घेणार आहेत. 

कोणताही औपचारिक प्रस्ताव आलेला नाही - सुप्रिया सुळे

आघाड्या कुणी कशा करायच्या, याबाबत अनेक पातळ्यांवर अनेक नेत्यांची चर्चा सुरू आहे. ठोस काहीतरी हाती येत नाही, तोपर्यंत आपण याबाबत कसे काय बोलणार? आमचा पक्ष लोकशाही पद्धतीने चालतो. त्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी चर्चा होईल. माझी आणि प्रशांत जगताप यांच्याशी दोन तास चर्चा झाली. काय पर्याय असू शकतात, याबाबत त्यांच्याकडून जाणून घेतले. मात्र माझ्याकडे कुठल्याही पक्षाचा प्रस्ताव औपचारिक पद्धतीने आलेला नाही. मुंबईत उद्धव ठाकरेंच्या पक्षाशीही आमची चर्चा सुरू आहे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in