वर्ध्यात काळे, दिंडोरीत भगरे; शरद पवार गटाचे ५ उमेदवार जाहीर

राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर केल्याने आता जवळपास या सर्वच मतदारसंघातील लढती स्पष्ट झाल्या आहेत. यात बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेविरुद्ध अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार यांच्यात सामना होणार आहे.
वर्ध्यात काळे, दिंडोरीत भगरे; शरद पवार गटाचे ५ उमेदवार जाहीर

विशेष प्रतिनिधी/मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शनिवारी आपल्या ५ उमेदवारांची नावे जाहीर केली असून, अपेक्षेप्रमाणे बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोल्हे, नगरमधून निलेश लंके यांच्यासोबतच वर्ध्यातून अमर काळे, दिंडोरीतून भास्करराव भगरे या नव्या चेहऱ्यांना मैदानात उतरवले आहे. भगरे हे माजी जि. प. अध्यक्ष आहेत. पवारांनी तगडे उमेदवार मैदानात उतरवल्याने या मतदारसंघांत चुरस वाढणार आहे. विशेषत: बारामतीची लढत लक्षवेधी ठरणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत पक्षाच्या पाच उमेदवारांची यादी जाहीर केली. बारामती हा पवार यांचा बालेकिल्ला असल्याने आणि सुप्रिया सुळे येथून तीनवेळा खासदार झाल्याने पुन्हा सुप्रिया सुळे यांनाच उमेदवारी मिळणार, हे जवळपास निश्चित होते. कारण सुप्रिया सुळे यांनी अगोदरच तयारी सुरू केली होती. तसेच शिरूरमधूनही विद्यमान खासदार अमोल कोल्हे शरद पवार गटासोबत असल्याने ती उमेदवारीही निश्चित होती.

याशिवाय निलेश लंकेही अजित पवार गटातून शरद पवार गटात आल्याने नगरमधून लढणार, हेही निश्चित होते. मात्र, इतर जागांची उत्सुकता होती. त्यात दिंडोरीतून नवा चेहरा भास्करराव भगरे यांना उमेदवारी दिली आहे. तसेच वर्ध्यातूनही माजी आमदार अमर काळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. अमर काळे यांनी शुक्रवारीच राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. यासोबतच नितेश कराळे गुरुजीही येथून इच्छुक होते. परंतु, त्यांच्याऐवजी अमर काळेंना संधी देण्यात आली.

अशा रंगणार लढती

राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर केल्याने आता जवळपास या सर्वच मतदारसंघातील लढती स्पष्ट झाल्या आहेत. यात बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेविरुद्ध अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार यांच्यात सामना होणार आहे. शिरूरमध्ये अमोल कोल्हेंविरुद्ध अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील, दिंडोरीत भास्करराव भगरेंविरुद्ध भाजपच्या भारती पवार, नगरमध्ये निलेश लंकेविरुद्ध भाजपचे सुजय विखे आणि वर्ध्यात अमर काळेविरुद्ध भाजपचे रामदास तडस यांच्यात लढत होईल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in