माढ्यात धैर्यशील मोहिते-पाटील : शरद पवारांच्या खेळीने भाजपची कोंडी

शरद पवार यांनी जवळपास सर्वच उमेदवारांची नावे जाहीर केली. परंतु, माढ्यातून सुरुवातीपासूनच सावध पावले टाकायला सुरुवात केली होती. त्यामुळे या लोकसभा मतदारसंघातून ते मोठी खेळी करणार, याची सर्वांनाच खात्री वाटत होती. प्रथम रासपचे महादेव जानकर यांना टप्प्यात घेऊन त्यांनी पहिला डाव टाकला होता.
माढ्यात धैर्यशील मोहिते-पाटील : शरद पवारांच्या खेळीने भाजपची कोंडी
Published on

विशेष प्रतिनिधी/मुंबई

महाराष्ट्राच्या राजकारणातील सहकारमहर्षी स्वर्गीय शंकरराव मोहिते-पाटील घराण्यात तिसऱ्यांदा फूट पडली आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे लहान बंधू माजी मंत्री स्व. प्रतापसिंह मोहिते-पाटील स्व. गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत भाजपमध्ये गेले त्यावेळी पहिली फूट पडली. त्यांचे चिरंजीव आमदार रणजितसिंह राष्ट्रवादी काँग्रेस सोडून देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजपमध्ये गेले तेव्हा दुसरी फूट पडली व आता त्यांचे पुतणे धैर्यशील हे शरद पवारांचे बोट धरून माढा लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून मैदानात उतरत आहेत. ही मोहिते-पाटील घराण्यातील तिसरी फूट ठरली आहे.

शरद पवार यांनी जवळपास सर्वच उमेदवारांची नावे जाहीर केली. परंतु, माढ्यातून सुरुवातीपासूनच सावध पावले टाकायला सुरुवात केली होती. त्यामुळे या लोकसभा मतदारसंघातून ते मोठी खेळी करणार, याची सर्वांनाच खात्री वाटत होती. प्रथम रासपचे महादेव जानकर यांना टप्प्यात घेऊन त्यांनी पहिला डाव टाकला होता. त्यातून महायुतीचा पक्का गेम झाला होता. परंतु, ऐनवेळी महादेव जानकर यांनी यूटर्न घेत महायुतीत उडी मारली. मात्र, शरद पवारांनी न डगमगता दुसरा डाव राखून ठेवला होता. त्यामुळे माढ्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर थेट अकलूजच्या मोहिते पाटील घराण्यालाच सोबत घेत महायुतीला धोबीपछाड देण्याची रणनीती त्यांनी आखली असून, धैर्यशील मोहिते-पाटील यांची उमेदवारी आता निश्चित झाली आहे.

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते-पाटील यांनी गुरुवारी थेट पुण्यात जाऊन मोदीबाग येथे शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्यासमवेत संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड आणि शेकापचे बाबासाहेब देशमुख उपस्थित होते. यावेळी त्यांच्यात पुढील रणनीतीविषयी चर्चा झाली. त्यानुसार आता धैर्यशील मोहिते-पाटील १४ एप्रिलला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार असून, त्यानंतर १६ एप्रिल रोजी ते उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आता थेट भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यातच लढत रंगणार असून, हा भाजप आणि एकूणच महायुतीला धक्का मानला जात आहे.

भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या उमेदवारीला यावेळी मोहिते-पाटील यांनी विरोध केला होता. कारण मोहिते पाटील यांच्या साथीने निवडून येऊनही मागच्या पाच वर्षांत त्यांनी या घराण्याला सातत्याने डावलण्याचे काम केले. त्यामुळे मोहिते-पाटील यांनी त्यांच्या विरोधात तक्रार करीत त्यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी केली होती. परंतु, त्यांचे म्हणणे विचारात न घेता त्यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे विजयसिंह मोहिते-पाटील यांचे घराणे आणि फलटणचे रामराजे नाईक-निंबाळकर यांचे घराणे यांच्यात नाराजी वाढली होती. त्यातूनच धैर्यशील मोहिते-पाटील यांनी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. अखेर ते थेट राष्ट्रवादीत जाऊन लढत देणार असल्याने भाजपसमोर तगडे आव्हान उभे राहणार आहे.

मेळावा घेऊन शक्तिप्रदर्शन

धैर्यशील मोहिते-पाटील यांचा पक्षप्रवेशाआधी शरद पवार यांच्या उपस्थितीत अकलूजमध्ये एक मेळावा घेण्याचा विचार असल्याचे बोलले जाते. या माध्यमातून मोहिते-पाटील यांना शक्तिप्रदर्शन करायचे आहे. त्यामुळे त्या दृष्टीनेदेखील नियोजन सुरू आहे. त्यातच दि. १६ एप्रिल रोजी काँग्रेसच्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यासमवेत धैर्यशील मोहितेही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. या माध्यमातूनही शक्तिप्रदर्शन करण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न राहू शकतो.

logo
marathi.freepressjournal.in