
महाराष्ट्रात सध्या राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरून राजकारण चांगलेच वाढले आहे. ‘काळी टोपी हटवा, महाराष्ट्र वाचवा’ अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील सावरकर पुतळ्याजवळ आंदोलन सुरु झाले.
'छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एकेरी उल्लेख करणाऱ्या राज्यपालांचा जाहीर निषेध' अशा आशयाचे फलक हातात घेऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्यपालांविरोधात आंदोलन सुरु केले आहे. तसेच, ठाकरे गटाच्या शिवसेनेनेदेखील याबद्दल आक्रमक पवित्रा घेत आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे. याच पार्श्वभूमीवर आता राजभवनाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
राजभवनाबाहेर पोलिसांच्या दोन तुकड्या करण्यात आल्या आहेत. पोलिसांकडून प्रत्येक वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. सध्या राजभवनाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. याआधीही पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपालांचे धोतर फेडणाऱ्यास १ लाखांचे बक्षिस जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी राज्यपालांविरोधात शिवसेना, राष्ट्रवादीकडून आंदोलने करण्यात येत आहेत.