प्रतिनिधी/ जळगाव : बारामतीप्रमाणेच रावेर लोकसभा मतदारसंघातही नणंद विरुद्ध भावजय लढत व्हावी, असा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून केला जात आहे. भाजपच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे यांचे नाव जाहीर झाल्यानंतर शरद पवार गटाकडून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्षा रोहिणी खडसे यांना राष्ट्रवादीकडून निवडणूक रिंगणात उतरविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
शरद पवार गटाने रावेर लोकसभा मतदारसंघातून यापूर्वी एकनाथ खडसे यांची उमेदवारी जाहीर केली होती. खडसे यांनी देखील निवडणूक लढविण्याचे मान्य केले होते. त्यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघात एकनाथ खडसे विरुद्ध रक्षा खडसे - सासरे विरुद्ध सून असा सामना रंगणार काय, याची चर्चा सुरू झाली होती. दरम्यान, एकनाथ खडसेंनी प्रकृतीचे कारण देत निवडणूक लढवण्यास असमर्थता दाखवली. भाजपने अधिकृतरीत्या रक्षा खडसे यांची उमेदवारी जाहीर करताच त्यांच्याविरोधात तगडा उमेदवार दिला जावा याबाबत पवार गटाच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली. जिल्ह्यातून रोहिणी खडसे यांच्या नावाचा ठराव करून तो शरद पवार यांच्याकडे पाठवला गेला. यावर गंभीर विचार सुरू असल्याचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्याकडून सांगण्यात आले. त्यामुळे रावेरमध्ये बारामतीप्रमाणे नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगणार काय, अशी चर्चा सुरू झाली.
दरम्यान, रोहिणी खडसे यांच्याशी संपर्क साधला असता आपण लोकसभेसाठी इच्छुक नसून विधानसभेसाठी इच्छुक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रोहिणी खडसेंनी नकार दिल्यास जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, माजी आ. अरुण पाटील यांची नावे रविवारी पक्षात चर्चेत आली. रावेरमध्ये रक्षा खडसे यांच्याविरोधात तगडा उमेदवार न मिळाल्यास काँग्रेस अत्यंत कमकुवत असल्याने ही जागा शिवसेना ठाकरे गटाकडे जाऊ शकते. पडद्याआड तशा हालचाली सुरू आहेत. तसे झाल्यास जळगाव आणि रावेर दोन्ही मतदारसंघांत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार असतील.
नाराजीतून भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे यांचे नाव जाहीर होताच या मतदारसंघातून इच्छुक असलेले अमोल जावळे यांच्या यावल, रावेर तालुक्यातील समर्थकांनी, भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. पक्षातील या असंतोषाने भाजप हादरला असून तातडीने यामागील कारणांचा व सूत्रधाराचा शोध घेण्यास पक्षाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना कामास लावण्यात आले आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या जिल्ह्यातील ही नाराजी बाहेर आली आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात देखील उन्मेष पाटील यांचे तिकीट कापले गेल्यानंतर नाराजी उमटू लागली आहे.