

पुणे : पुणे येथील खडकवासला स्थित राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) च्या १५० व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा (पासिंग आऊट परेड) शनिवारी अत्यंत दिमाखात आणि लष्करी शिस्तीत पार पडला. आकाशात झेपावणाऱ्या लढाऊ विमानांच्या चित्तथरारक कसरती, शिस्त, निष्ठा आणि देशप्रेमाचे दर्शन घडवणाऱ्या या सोहळ्याने उपस्थितांची मने जिंकली. देशभरातून आलेल्या पालकांनी आपल्या पाल्यांना लष्करी गणवेशात पाहून अभिमान व्यक्त केला.
या तुकडीतील १८ महिला कॅडेट्ससह एकूण ३५३ कॅडेट्सनी 'ओल्ड लँग साईन'च्या भावस्पर्शी सुरावटीत 'अंतिम पाऊल' ओलांडत आपल्या लष्करी कारकिर्दीच्या नव्या पर्वाला सुरुवात केली. या ऐतिहासिक सोहळ्याला जनरल उपेंद्र द्विवेदी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी संचलनाची पाहणी करून - मानवंदना स्वीकारली.
४२ वर्षांपूर्वी याच मैदानावरून उत्तीर्ण झाल्याच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी हा क्षण स्वतःसाठी भावनिक आणि अभिमानास्पद असल्याचे सांगितले. कॅडेट्सना मार्गदर्शन करताना त्यांनी 'सेवा परमो धर्म' हा मंत्र देत कठीण परिस्थितीतही देशसेवेसाठी सदैव तत्पर राहण्याचे आवाहन केले. 'ऑपरेशन सिंदूर' चा उल्लेख करत त्यांनी राष्ट्रीय इच्छाशक्ती, अचूकता आणि निर्धार यांचे महत्त्व अधोरेखित केले. सोहळ्याच्या अखेरीस लष्करी बँडने 'ओल्ड लंग साईन' ची धून वाजवताच १५० व्या तुकडीतील कॅडेट्सनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने 'क्वार्टर डेक' ओलांडला. हा क्षण त्यांच्या लष्करी आयुष्यातील नव्या प्रवासाची सुरुवात ठरला, तर पालकांसाठी तो अभिमानाचा आणि अविस्मरणीय क्षण ठरला. एनडीएमधील तीन वर्षांच्या कठोर प्रशिक्षणानंतर हे कॅडेट्स आता विविध लष्करी अकादमींमध्ये पुढील प्रशिक्षणासाठी रवाना होणार आहेत.
राष्ट्रपती सुवर्णपदक रोहित काजलाला
कॅप्टन रोहित काजला यांना राष्ट्रपतींचे प्रतिष्ठित सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. माईक स्क्वॉड्रनचे अकॅडमी कॅडेट अॅडज्युटंट शौर्य यांना रौप्यपदक, तर ब्राव्हो स्क्वॉड्रनचे बटालियन कॅडेट कॅप्टन सान शर्मा यांना कांस्यपदक देऊन गौरविण्यात आले. यावर्षीचा 'चीफ ऑफ स्टाफ बॅनर' चार्ली स्क्वॉड्रनने पटकावला.
आज स्पर्धा आणि संघर्ष यांच्यातील सीमा पुसट होत चालल्या आहेत. धोके नेहमी गणवेशात किंवा उघडपणे समोर येत नाहीत. 'वो झोन पासून ते हायब्रिड युद्धापर्यंत विविध स्वरूपातील आव्हाने देशासमोर आहेत. अशा परिस्थितीत केवळ कृती नव्हे तर विचारपूर्वक कृती करणे आवश्यक आहे.
उपेंद्र द्विवेदी, जनरल
रणांगण लिंगभेद मानत नाही
या तुकडीत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या १८ महिला कॅडेट्सचे विशेष कौतुक करताना जनरल द्विवेदी म्हणाले, महिला कॅडेट्सनी प्रशिक्षणातील सर्व निकष यशस्वीरित्या पूर्ण केले असून प्रत्येक फॉर्मेशनमध्ये त्यांनी पुरुष कॅडेट्सच्या खांद्याला खांदा लावून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. रणांगण हे लिंगभेदाला थारा देत नाही. जिद्द, चिकाटी आणि संकल्प यांना कोणतेही लिंग नसते.
२४ परदेशी कॅडेट्स सहभागी
१२ मित्रदेशांतील २४ परदेशी कॅडेट्सनीही प्रशिक्षण पूर्ण केले. संचलनादरम्यान हेलिकॉप्टर आणि सुखोई-३० एमकेआय लढाऊ विमानांनी' फ्लायपास्ट' करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. मिग-१७ हेलिकॉप्टर्सनी 'साइन फॉर्मेशन' तर सुखोई विमानांनी 'त्रिशूल' आणि 'न्हिनो' फॉर्मेशनमध्ये उड्डाण करून आकर्षक सादरीकरण केले.