एनडीएमधील पहिली महिला बॅच सज्ज; पासिंग आऊट परेडमध्ये ३३९ कॅडेट्सना पदवी प्रदान

पुण्यातील खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) येथे १४८ वा दीक्षांत सोहळा (पासिंग आऊट परेड) शुक्रवारी पार पडला. आजचा दिवस भारतीय संरक्षण दलांच्या इतिहासात एक सुवर्ण अक्षरांनी नोंदवणारा दिवस ठरला. अत्यंत दिमाखदार आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यात, एनडीएच्या गौरवशाली इतिहासात प्रथमच महिला कॅडेट्सची पहिली तुकडी आपले खडतर प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करून बाहेर पडली.
एनडीएमधील पहिली महिला बॅच सज्ज; पासिंग आऊट परेडमध्ये ३३९ कॅडेट्सना पदवी प्रदान
Published on

पुणे : पुण्यातील खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) येथे १४८ वा दीक्षांत सोहळा (पासिंग आऊट परेड) शुक्रवारी पार पडला. आजचा दिवस भारतीय संरक्षण दलांच्या इतिहासात एक सुवर्ण अक्षरांनी नोंदवणारा दिवस ठरला. अत्यंत दिमाखदार आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यात, एनडीएच्या गौरवशाली इतिहासात प्रथमच महिला कॅडेट्सची पहिली तुकडी आपले खडतर प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करून बाहेर पडली, हा क्षण भारतीय संरक्षण क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

या १४८ व्या एनडीए कोर्सच्या दीक्षांत सोहळ्यात एकूण ३३९ कॅडेट्सना पदवी प्रदान करण्यात आली. परेडमध्ये एकूण ३३६ कॅडेट्स सहभागी झाले होते. या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून मिझोरमचे राज्यपाल जनरल (डॉ.) व्ही. के. सिंग (सेवानिवृत्त) उपस्थित होते. एनडीएचे कमांडंट व्हाईस ॲडमिरल गुरचरण सिंह आणि इतर वरिष्ठ अधिकारीही त्यांच्यासमवेत उपस्थित होते.

जनरल (डॉ.) व्ही. के. सिंग गुणवत्तेनुसार प्रथम, द्वितीय आणि तृतीय स्थान मिळवलेल्या कॅडेट्सना राष्ट्रपती सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके प्रदान केली. बीसीए प्रिन्स राज यांना सुवर्ण पदक, एसीसी उदयवीर सिंग नेगी यांना रौप्य पदक आणि बीसीसी तेजस भट्ट यांना कांस्य पदक मिळाले. अकॅडमी कॅडेट कॅप्टन उदयवीर सिंग नेगी यांनी परेडचे नेतृत्व केले, तर लेफ्टनंट कर्नल प्रवीण कुमार तिवारी यांनी

परेडचे संचालन केले. परेडमध्ये चेतक हेलिकॉप्टर, सुपर डिमोना ग्लायडर्स आणि सुखोई-३० लढाऊ विमानांचा शानदार ‘फ्लायपास्ट’ देखील पाहायला मिळाला.

या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी देशभरातून आलेल्या महिला कॅडेट्सचे पालक आणि कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. काही पालक तर पहाटे साडेचार वाजल्यापासूनच उपस्थित होते. आपल्या मुलींना परेडमध्ये पाहून त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंदाची, गर्वाची आणि समाधानाची भावना स्पष्ट दिसत होती.

एनडीएत महिलांच्या प्रवेशाचा मार्ग भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या २०२१ मध्ये दिलेल्या एका महत्त्वपूर्ण अंतरिम निर्णयानंतर खुला झाला. यापूर्वी, महिला आणि इच्छुक उमेदवार गेल्या जवळपास तीन दशकांपासून (१९९० च्या दशकापासून) कायमस्वरूपी स्थान मिळवण्यासाठी कायदेशीर मार्गाने संघर्ष करत होत्या. या पहिल्या महिलांच्या तुकडीने प्रशिक्षणात अत्यंत चमकदार कामगिरी केली आहे. टॉप परफॉर्मिंग कॅडेट्समध्ये काही महिला कॅडेट्सचाही समावेश आहे. विशेषतः, कॅडेट शिशी डाक ही सिल्व्हर मेडल आणि चीफ ऑफ एअर स्टाफ ट्रॉफी जिंकणारी पहिली महिला कॅडेट ठरली आहे, ही एक ऐतिहासिक कामगिरी आहे.

‘हर काम देश के नाम’

‘हर काम देश के नाम’ या ब्रीदवाक्यानुसार पहिली महिलांची तुकडी देशसेवेच्या प्रवासाला सज्ज झाली आहे. या ऐतिहासिक तुकडीत एकूण १७ महिला कॅडेट्सचा समावेश आहे. त्यांनी खडतर प्रशिक्षण पूर्ण केले असून, त्या आता भारतीय सशस्त्र दलांच्या तिन्ही प्रमुख शाखांमध्ये- थल सेना (आर्मी), वायु सेना (एअर फोर्स) आणि जल सेना (नेव्ही) अधिकारी म्हणून रूजू होण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत. एनडीएतून उत्तीर्ण झाल्यानंतर त्या आता त्यांच्या संबंधित प्री-कमिशनिंग ट्रेनिंग अकादमीमध्ये दाखल होतील.

महिला कॅडेट्स ‘नारी शक्ती’चे प्रतीक

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी असलेले भारताचे माजी लष्करप्रमुख आणि सध्या मिझोरमचे राज्यपाल असलेले जनरल व्ही. के. सिंह (निवृत्त) यांनी या दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, ‘हा अकादमीच्या इतिहासातील एक अद्वितीय दिवस आहे.’ ते पुढे म्हणाले, ‘या महिला कॅडेट्स ‘नारी शक्ती’चे प्रतीक आहेत. हा केवळ महिलांच्या विकासाचा विषय नाही, तर महिला-नेतृत्व विकासाचा विषय आहे.’ हे प्रशिक्षण पूर्ण होणे म्हणजे शेवट नसून नव्या शक्यतांची सुरुवात आहे, असे त्यांनी महिला कॅडेट्सना सांगितले. त्यांनी रामधारी सिंह ‘दिनकर’ यांच्या प्रसिद्ध ओळी ‘मानव जब जोर लगाता है, पत्थर पानी बन जाता है’ याची आठवण करून दिली. या प्रसंगी एनडीएचे कमांडंट व्हाईस ॲडमिरल गुरचरण सिंह आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उत्तीर्ण १७ महिला कॅडेट्सची प्रेरणादायी कथा

  • हरसिमरन कौर (हरयाणा): हरयाणाची हरसिमरन कौर ही नौदलात अधिकारी म्हणून इंडियन नेव्हल ॲकॅडमीमध्ये दाखल होणार आहे. तिचे वडील सैन्य दलात हवालदार पदावरून निवृत्त झाले आहेत, तर आजोबाही सैन्यात होते. यामुळे संरक्षण दलांशी तिचा घट्ट संबंध आहे. जेईई मेन्सची तयारी करत असताना तिला एनडीएमध्ये मुलींसाठी प्रवेश सुरू झाल्याचे कळले आणि तिने सैन्य दलात येण्याचा निर्णय घेतला.

  • श्रृती दक्ष (दिल्ली): दिल्ली विद्यापीठाच्या श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समधून बी.कॉम (ऑनर्स) पदवी घेतलेली श्रृती दक्ष हिचे वडील हवाई दलात विंग कमांडर होते. श्रीतीने सांगितले की, एनडीएचा अनुभव तिच्या अपेक्षेपेक्षा खूपच चांगला होता. येथेच तिला लष्करी प्रशिक्षणाचा खरा अनुभव मिळाल्याचे तिने सांगितले.

  • इशिता सांगवान: इशिता सांगवान हिला कुठलीही लष्करी पार्श्वभूमी नाही. तिचे पालक कॉर्पोरेट क्षेत्रात काम करतात आणि भाऊ आयटी व्यावसायिक आहे. २०२२ मध्ये जेव्हा एनडीएमध्ये मुलींना प्रवेशाची परवानगी मिळाली, तेव्हा ती इकॉनॉमिक्समधून पदवीचे शिक्षण घेत होती. तिने अर्ज केला आणि तिची निवड झाली. एनडीएच्या प्रशिक्षणादरम्यान तिच्यात समानतेची भावना विकसित झाल्याचे तिने सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in