एनडीएमध्ये महिलांची पहिली बॅच पदवीधर; दीक्षांत समारंभात ३३९ कॅडेट्सना पदवी प्रदान, आज होणार पासिंग आउट परेड

भारतीय सशस्त्र दलांमधील महिलांसाठी एका ऐतिहासिक क्षणाची नोंद करत, राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA), पुणे येथून महिला कॅडेट्सची पहिली तुकडी गुरुवारी, २९ मे रोजी पदवीधर झाली आहे. १४८ व्या एनडीए अभ्यासक्रमाच्या दीक्षांत समारंभात एकूण ३३९ कॅडेट्सना पदवी प्रदान करण्यात आली, ज्यात १७ महिला कॅडेट्सचा समावेश आहे. दरम्यान, शुक्रवारी या १४८ व्या तुकडीची पासिंग आउट परेड (पीओपी) होणार आहे.
एनडीएमध्ये महिलांची पहिली बॅच पदवीधर; दीक्षांत समारंभात ३३९ कॅडेट्सना पदवी प्रदान, आज होणार पासिंग आउट परेड
Published on

पुणे : भारतीय सशस्त्र दलांमधील महिलांसाठी एका ऐतिहासिक क्षणाची नोंद करत, राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA), पुणे येथून महिला कॅडेट्सची पहिली तुकडी गुरुवारी, २९ मे रोजी पदवीधर झाली आहे. १४८ व्या एनडीए अभ्यासक्रमाच्या दीक्षांत समारंभात एकूण ३३९ कॅडेट्सना पदवी प्रदान करण्यात आली, ज्यात १७ महिला कॅडेट्सचा समावेश आहे. दरम्यान, शुक्रवारी या १४८ व्या तुकडीची पासिंग आउट परेड (पीओपी) होणार आहे. या ऐतिहासिक परेडचे समीक्षण अधिकारी भारतीय सैन्याचे माजी प्रमुख आणि सध्या मिझोरमचे राज्यपाल असलेले जनरल विजय कुमार सिंह (निवृत्त) असतील. अवॉर्ड विजेती कॅडेट श्रृती दक्ष ही पहिली गर्ल्स कॅडेट बनली असून, एनडीएच्या इतिहासात तिने आपले नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले आहे.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) मधून उत्तीर्ण झालेल्या १७ महिला कॅडेट्सना गुरुवारी झालेल्या पदवीप्रदान समारंभात दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी देण्यात आली. एनडीएच्या १४८व्या बॅचचा पदवीप्रदान समारंभ गुरुवारी मेजर जनरल हबीबुल्ला सभागृहात पार पडला. समारंभाला गोरखपूरच्या दीनदयाळ उपाध्याय विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. डॉ. पूनम टंडन मुख्य पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. एनडीएचे कमांडंट व्हाइस ॲडमिरल गुरचरणसिंह, डेप्युटी कमांडंट सरताज बेदी, प्राचार्य ओमप्रकाश शुक्ला आणि विविध फॅकल्टी प्रमुखही व्यासपीठावर उपस्थित होते.

बीएस्सी (B.Sc.) मध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या कॅडेट लकीकुमार याला सिल्व्हर मेडल आणि चीफ ऑफ आर्मी स्टाफ ट्रॉफी देण्यात आली. बीएस्सी (कॉम्प्युटर सायन्स) मध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या कॅडेट प्रिन्सकुमारसिंह कुशवाह याला सिल्व्हर मेडल आणि चीफ ऑफ नेव्हल स्टाफ ट्रॉफीने सन्मानित करण्यात आले.

बीएमध्ये प्रथम क्रमांक मिळवणारी महिला कॅडेट श्रृती दक्षला सिल्व्हर मेडल आणि चीफ ऑफ एअर स्टाफ ट्रॉफी देण्यात आली. बी.टेक मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या कॅडेट उदयवीर सिंह नेगी याला सिल्व्हर मेडल आणि सीआयएससी ट्रॉफीने गौरवण्यात आले.

पदवी प्राप्त करणाऱ्यांमध्ये विज्ञान शाखेतील ८४, कॉम्प्युटर सायन्स शाखेतील ८५ आणि कला शाखेतील ५९ कॅडेट्स आहेत.

नेव्ही आणि एअर फोर्समधील बी.टेक शाखेच्या १११ कॅडेट्सना तीन वर्षांचे अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र मिळाले आहे. या नेव्ही आणि एअर फोर्स कॅडेट्सना त्यांच्या संबंधित अकादमींमधील (इंडियन नेव्हल अकादमी आणि एअर फोर्स अकादमी) एक वर्षाच्या प्रशिक्षणानंतर पदवी दिली जाईल. या वर्षी उत्तीर्ण होणाऱ्या तुकडीमध्ये १७ मित्र देशांचे कॅडेट्स देखील होते.

महिलांना एनडीएत प्रवेशाची परवानगी २०२१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मिळाली होती, ज्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) महिलांना अर्ज करण्यास संमती दिली. महिला कॅडेट्सची पहिली तुकडी जुलै-ऑगस्ट २०२२ मध्ये १४८ व्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून एनडीएमध्ये दाखल झाली.

‘आम्ही चालवू हा पुढे वारसा..’

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १४८ व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा गुरुवारी दिमाखात पार पडला. यामध्ये ३३९ छात्रांनी विविध विषयांत पदवी घेतली. यात चमकदार कामगिरी केलेल्या छात्रांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी माध्यमांशी संवाद साधून अनुभव व्यक्त केले. विशेष म्हणजे ‘एनडीए’तील लष्करी प्रशिक्षणासोबतच चार छात्रांनी अभ्यासातही चमकदार कामगिरी करून रौप्यपदक पटकाविले. श्रृती दक्षने कला शाखेत, उदयवीरसिंह नेगीने बीकेट, प्रिन्सकुमारसिंह कुशवाह याने बीएससी कॉम्प्युटर सायन्स, तर लकीकुमारने ‘बीएससी’मध्ये रौप्यपदक मिळविले. या चारही छात्रांना कुटुंबातून लष्करी वारसा मिळालेला आहे. त्यांनी केलेल्या या कामगिरीमुळे ‘आम्ही चालवू हा पुढे वारसा..’ हे प्रत्यक्षात उतरवून दाखविले.

logo
marathi.freepressjournal.in