
पुणे : पुणे शहरातील खडकवासला भागात असलेल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत पहिल्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याने संशयास्पदरित्या गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत विद्यार्थ्याचे नाव अंतरिक्ष कुमार (वय १८) असे आहे. या घटनेमुळे एनडीए परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
एनडीए मध्ये प्रवेश मिळवण्यासाठीची कठीण परीक्षा अंतरिक्ष कुमार याने यंदाच्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात यशस्वीरीत्या पास केली होती. एनडीएच्या १५४ व्या तुकडीत तीन वर्षांच्या खडतर प्रशिक्षणासाठी तो जुलै महिन्यात दाखल झाला होता. एनडीएतील चार्ली स्क्वाड्रन मध्ये तो पहिल्या वर्षात शिक्षण घेत होता.
शुक्रवारी (दि. १०) पहाटेच्या सुमारास अंतरिक्ष कुमारने त्याच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या आत्महत्येची माहिती मिळाल्यावर उत्तमनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मुलाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
उत्तर प्रदेशातील रहिवासी, माजी सैनिकाचा मुलगा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत विद्यार्थी अंतरिक्ष कुमार हा मूळचा उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील रहिवासी आहे. विशेष म्हणजे, त्याचे वडील हे लष्करातून निवृत्त झालेले (माजी सैनिक) आहेत, आणि ते कुटुंबासह लखनऊ येथे राहतात.