

पुणे : नाशिकमधील तथाकथित भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याच्या अटकेनंतर आता राज्यातील राजकीय वातावरण पूर्णपणे तापले असून, या प्रकरणात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे नाव आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करत, त्यांची एसआयटी मार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. खरातच्या ज्या कॉलेज रोडवरील कार्यालयात महिलांचे लैंगिक शोषण चालायचे, त्याच ठिकाणी नीलम गोऱ्हे दोन वेळा गेल्या होत्या आणि मंत्रिपद तसेच आमदारकी मिळवण्यासाठी त्यांनी तिथे भविष्यवाणी व पूजा केल्याचा दावा देसाई यांनी केला आहे.
तृप्ती देसाई यांनी दावा केला की, नीलम गोऱ्हे या केवळ एकदाच नव्हे तर गेल्या ७-८ वर्षांपासून अशोक खरातच्या संपर्कात आहेत. कोरोना काळापूर्वी नाशिकमधील 'एक्सप्रेस इन' हॉटेलमध्ये त्यांची भेट झाली होती आणि या भेटीत खरातला बेकायदेशीरपणे शस्त्र परवाना मिळवून देण्यासाठी काही मध्यस्थी झाली होती का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. या शस्त्र परवान्याची कोणतीही अधिकृत नोंद नसल्याने तत्कालीन पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी आता संशयाच्या भोवऱ्यात आले आहेत. याशिवाय, नाशिक परिक्षेत्राचे आयजी दत्तात्रेय कराळे यांचेही खरातसोबतचे फोटो समोर आले असून, डिसेंबर २०२५ मधील एका खंडणी प्रकरणातील महत्त्वाचे पेनड्राईव्ह गायब करण्याचे आदेश कराळे यांनीच दिले होते, असा खळबळजनक आरोप देसाई यांनी केला.
आरोप कपोलकल्पित- नीलम गोऱ्हे
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी अशोक खरात प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करत, आपल्यावरील सर्व आरोप ‘कपोलकल्पित’ आणि राजकीय सूडबुद्धीतून रचलेले षडयंत्र असल्याचे पुण्यामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. गेल्या चार दशकांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असून आपली कारकीर्द स्वच्छ आणि पारदर्शी राहिलेली आहे, असे नमूद करत गोऱ्हे यांनी स्पष्ट केले की, त्यांनी कधीही कोणत्याही ढोंगी बुवा किंवा तांत्रिक गुरूची मदत घेतलेली नाही. नाशिक येथील ‘एक्सप्रेस इन’ हॉटेलमध्ये खरात नावाच्या व्यक्तीला आपण कधीही भेटलेलो नाही आणि तशा बातम्या निराधार आहेत. मंत्रिपद मिळवण्यासाठी तीन तास पूजा केल्याचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला. आपण प्रबोधनकारी हिंदुत्व मानणारे असून, घराण्यातून मिळालेल्या संस्कारांमुळे अशा गोष्टींना आपल्या आयुष्यात थारा नाही, असे त्यांनी सांगितले. या आरोपांमागे राजकीय हितशत्रूंचा हात असल्याचा संशय व्यक्त करत गोऱ्हे म्हणाल्या की, पुणे महानगरपालिकेत ज्यांना यश मिळाले नाही, असे काही असंतुष्ट घटक हे विषारी षडयंत्र रचत आहेत. साताऱ्याच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे निर्देश दिल्याने किंवा आपल्या संसदीय कार्यामुळे काही लोकांमध्ये द्वेष निर्माण झाला असावा त्यातून हे आरोप होत असल्याचे त्यांनी नमूद केले. आपण संयम राखला होता; मात्र आता सत्य समोर येईलच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.