नीट पेपरफुटीः पुण्यातून महिलेसह पाच ताब्यात; कोचिंग क्लासेस, डॉक्टर्स यांचाही सहभाग?

देशभरात गाजलेल्या 'नीट' परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता महाराष्ट्रापर्यंत पोहोचले असून याप्रकरणी अहिल्यानगर, पुणे पोलीस आणि सीबीआयने केलेल्या संयुक्त कारवाईत एका ४६ वषीय महिलेसह चौघांना ताब्यात घेतल्याने या रॅकेटचे मोठे जाळे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नीट पेपरफुटीः पुण्यातून महिलेसह पाच ताब्यात; कोचिंग क्लासेस, डॉक्टर्स यांचाही सहभाग?
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

पुणे, अहिल्यानगरः देशभरात गाजलेल्या 'नीट' परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता महाराष्ट्रापर्यंत पोहोचले असून याप्रकरणी अहिल्यानगर, पुणे पोलीस आणि सीबीआयने केलेल्या संयुक्त कारवाईत एका ४६ वषीय महिलेसह चौघांना ताब्यात घेतल्याने या रॅकेटचे मोठे जाळे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या प्रकरणात सीबीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार वेगवगेळी पथके तयार करून तांत्रिक माहिती आधारे तपास सुरू करण्यात आला. पुण्यातील सुखसागरनगर परिसरातून मनीषा संजय वाघमारे (४६) या महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. मनीषा वाघमारे या व्यवसायाने ब्युटीशियन असून त्यांचे स्वतःचे ब्युटी पार्लर आहे. तर त्यांचे पती डेंटिस्ट असून त्यांचे क्लिनिक आहे.

अहिल्यानगर येथून अटक करण्यात आलेला या प्रकरणातील मुख्य एजंट धनंजय लोखंडे याच्या चौकशीतून मनीषाचे नाव पुढे आले होते. मनीषा ही विद्यार्थ्यांना हेरून त्यांना मुख्य एजंट धनंजय लोखंडेपर्यंत पोहोचवण्याचे काम करत असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. बुधवारी पहाटे करण्यात आलेल्या या अत्यंत गोपनीय कारवाईत पोलिसांनी मनीषाच्या घरून तिचा मोबाईल फोन आणि लॅपटॉप जप्त केला आहे. या तांत्रिक पुराव्यांच्या प्राथमिक तपासणीत धनंजय लोखंडे आणि मनीषा वाघमारे यांच्यात अनेक संशयास्पद व्हॉट्सअॅप कॉल्स आणि टेलिग्राम मेसेजेसची देवाणघेवाण झाल्याचे रेकॉर्ड पोलिसांच्या हाती लागले आहेत.

शुभमचा जबाब

या रॅकेटमधील महत्त्वाचा दुवा असलेला धनंजय लोखंडे (२६) हा मूळचा राहुरी तालुक्मयातील माहेगावचा रहिवासी असून, तो गेल्या चार वर्षांपासून पुण्याच्या वाघोली परिसरात वास्तव्यास होता. त्याने दोन वर्षांपूर्वी मंगळूरमधून बीएएमएसचे शिक्षण पूर्ण केले असून, मेडिकल प्रॅक्टिसच्या नावाखाली तो अॅडमिशन कन्सल्टिंगचे काम करत असल्याचे तपासात उघड झाले आहे. नाशिकच्या शुभम खैरनार याने दिलेल्या जबाबामुळे धनंजयचे नाव समोर आले होते आणि सीबीआयने त्याला राहुरीतून अटक केली होती. तर जुन्नर येथील आयुर्वेदिक डॉक्टर (बीएएमएस) ओंकार शिंगोटे याच्या या प्रकरणातील सहभागाबाबतही तपास करण्यात येत आहे.

पालक, विद्यार्थ्यांना दाखवायचे आमिष

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे संशयित प्रामुख्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करून वैद्यकीय शिक्षणासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांशी आणि त्यांच्या पालकांशी संपर्क साधत होते. आमच्याकडे नीट परीक्षेचा पेपर असून, तो आम्ही तुम्हाला विकू शकतो, असे आमिष हे आरोपी परीक्षार्थीना दाखवत असत. सोशल मीडियाच्या माध्यमातून या टोळीने अनेक विद्यार्थ्यांचे जाळे विणले होते.

मनीषा वाघमारेच्या खात्यावर दहा लाख ऊपये

तपासादरम्यान मनीषा वाघमारे यांच्यासंदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. नीट परीक्षेच्या प्रक्रियेदरम्यान वाघमारे यांच्याकडे तब्बल २१ वेगवेगळ्या बँक खात्यांतून १० लाख ऊपये जमा झाल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. ही रक्कम पेपर विक्रीसाठी किंवा त्यासंबंधित व्यवहारांसाठी आगाऊ म्हणून घेण्यात आल्याचा संशय आहे. या २१ खात्यांचा मालक कोण आहे आणि हा पैसा नेमका कोठून आला, याचा तपास आता सीबीआय करत आहे. मागील तीन वर्षांपासून वाघमारे ही आरोपींच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले आहे अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांनी दिली.

आणखी काही डॉक्टरांच्या सहभागाची शक्यता

पुणे पोलिसांची गुन्हे शाखा सध्या यातील आर्थिक व्यवहारांची बारकाईने चौकशी करत आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता मनीषा वाघमारेला पुढील तपासासाठी सीबीआयच्या ताब्यात दिले जाण्याची शक्मयता आहे. पश्चिम महाराष्ट्रात या पेपरफुटीचे मोठे जाळे पसरले असून, यामध्ये आणखी काही डॉक्टर आणि मोठ्या एजंटांचा समावेश असण्याची दाट शक्मयता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे. सीबीआयच्या पुढील चौकशीत या घोटाळ्याचे 'मास्टरमाईंड' आणि इतर 'बड्या माशांची' नावे समोर येण्याची शक्मयता असल्याने लाखो विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे लक्ष या तपासाकडे लागले आहे.

मोबाईल चॅट्समध्ये आर्थिक व्यवहारांचे पुरावे

या प्रकरणाचा तपास करत असलेल्या विशेष पथकाने कागदपत्रांची आणि संशयितांच्या मोबाईल चॅट्सची तपासणी केली आहे. यामध्ये काही आर्थिक व्यवहारांचे पुरावे सापडल्याचे समजते. पेपरफुटीचे मुख्य केंद्र बिहारमध्ये असल्याचे सांगण्यात येत असले तरी, या रॅकेटचे जाळे महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये पसरलेले असू शकते, असा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.

मोठ्या कोचिंग क्लासेसच्या सहभागाची शक्यता

या प्रकरणाचे मूळ जरी इतर राज्यांमध्ये दिसत असले तरी, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांपर्यंत पेपर पोहोचवण्यासाठी या स्थानिक कनेक्शनचा वापर झाल्याचा संशय आहे. तपासादरम्यान काही बँक खात्यांमधील संशयास्पद व्यवहारही यंत्रणांच्या हाती लागले आहेत. या पुराव्यांवरून महाराष्ट्रातील काही मोठे कोचिंग क्लास किंवा मध्यस्थ या रॅकेटमध्ये सामील असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लातूर कनेक्शन ? चौकशीला वेग

नीट पेपरफुटी प्रकरणात लातूर कनेक्शन समोर येण्याची शक्यता अधिक गडद होत आहे. एका विद्यार्थिनीच्या पालकांनी केलेल्या तक्रारीनंतर लातूर पोलिसांनी तपासाची गती वाढवली असून संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या खासगी क्लासेसची सखोल चौकशी सुरू केली आहे. संपूर्ण तपास अत्यंत गुप्ततेत सुरू आहे. या प्रकरणात संबंधित क्लास चालकाच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. बुधवारी पहाटे दोन जणांची आणि त्यानंतर आणखी दोन जणांची चौकशी करण्यात आली असून आतापर्यंत एकूण चार जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. चौकशीदरम्यान मिळालेल्या प्रत्येक माहितीची पोलिसांकडून बारकाईने पडताळणी केली जात आहे.

विद्यार्थिनीच्या पालकांची गंभीर तक्रार

एका विद्यार्थिनीच्या पालकांनी १२ मे रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात लेखी तक्रार दिली होती. या तक्रारीत लातूरमधील एका खासगी क्लासेसने परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना दिलेल्या मॉक टेस्टमधील तब्बल ४२ प्रश्न 'नीट' च्या प्रत्यक्ष परीक्षेत जशाच्या तसे आल्याचा गंभीर दावा करण्यात आला आहे.

तपास सीबीआयकडे सुपूर्द

नवी दिल्ली : देशभरात गाजत असलेल्या 'नीट-यूजी' परीक्षेतील कथित अनियमितता आणि पेपरफुटी प्रकरणाचा तपास केंद्र सरकारने आता 'केंद्रीय अन्वेषण विभागा'कडे (सीबीआय) सोपवला आहे. विद्यार्थ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि परीक्षेची पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे शिक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले. या प्रकरणात काही राज्यांमध्ये नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यांचा तपास आता सीबीआय करणार असून, यामध्ये व्यापक कटाचा शोध घेतला जाणार आहे. शिक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 'सीबीआय' आता या प्रकरणातील सर्व पैलूंचा तपास करेल. यामध्ये विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी सर्व कायदेशीर बाबी तपासल्या जातील. सरकारने यापूर्वीच 'एनटीए'च्या महासंचालकांना पदावरून हटवले असून, संपूर्ण परीक्षा प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्यावर भर दिला आहे.

logo
marathi.freepressjournal.in