

बीड : देशभरातील २२ लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाची व्याप्ती वाढली असतानाच, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि सेवानिवृत्त प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी याच्याकडे प्रशासनाने आता आपला मोर्चा वळवला आहे. बीड शहरातील शाहूनगर भागात कुलकर्णी याने उभारलेल्या चार मजली कथित अनधिकृत इमारतीवर अखेर पालिकेचा हातोडा पडला आहे.
सध्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली संबंधित ठेकेदाराकडूनच या चार मजली इमारतीचा अनधिकृत भाग हटविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पी. व्ही. कुलकर्णी हा मूळचा बीडचा असून, त्याने शाहू नगर परिसरात एका भव्य इमारतीचे बांधकाम सुरू केले होते. हे बांधकाम अनधिकृत असल्याचे समोर आल्यानंतर बीड नगरपालिकेने संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावून बांधकाम स्वतःहून पाडून घेण्याचे आदेश दिले होते. या नोटीसीची मुदत सोमवारी संपल्यानंतर प्रशासनाने कडक पवित्रा घेतला.अखेर कारवाईच्या भीतीने संबंधित ठेकेदाराकडूनच या अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवण्यात येत आहे.
पी. व्ही. कुलकर्णी मूळचा बीड येथील रहिवासी आहे. त्याचे शाहूनगर भागात वडिलोपार्जित घर होते. ते घर पाडून त्याने इथे इमारत उभारणी सुरू केली आहे. कुलकर्णी लातूरच्या एका नामांकित कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरीला होता. त्याचा लातूरमध्येही एक मोठा बंगला असल्याचेही समजते. निवृत्तीनंतर कुलकर्णीने आपले बस्तान पुण्याला हलवले होते. तिथेही त्याचे घर असल्याचे समजते. बीडमध्ये सुरू असलेल्या या बिल्डिंगच्या बांधकामात कुलकर्णीने काळा पैसा वापरल्याची चर्चा आहे. आता सीबीआयकडून ‘नीट’ पेपरफुटीच्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यातून हे सारे गौडबंगाल बाहेर येईलच.