राजकोटवर शिवरायांचा ६० फुटी तलवारधारी पुतळा उभारणार, खर्च २० कोटी; 'इतक्या' वर्षांची गॅरंटी!

पवई येथील 'आयआयटी’च्या मार्गदर्शनाखाली तसेच अनुभव असणाऱ्या शिल्पकारालाच हा पुतळा उभारण्याचे काम देण्यात येणार
राजकोटवर शिवरायांचा ६० फुटी तलवारधारी पुतळा उभारणार, खर्च २० कोटी; 'इतक्या' वर्षांची  गॅरंटी!
Published on

सिंधुदुर्गनगरी/राजन चव्हाण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट येथे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, त्याच ठिकाणी आता महाराजांचा ६० फूट उंचीचा तलवारधारी भव्यदिव्य पुतळा उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पुतळा उभारणीच्या कामासाठी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने २० कोटी रुपये खर्चाची निविदा काढली असून त्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

निविदेत १०० वर्षांच्या गॅरंटीची अट

संपूर्ण कामासाठी सुमारे २० कोटी अंदाजे खर्च निश्चित करण्यात आला आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे १०० वर्षांची गॅरंटी आणि १० वर्षें देखभाल दुरुस्ती या अटी शर्ती निविदेत नमूद करण्यात आल्या आहेत.

राजकोट किल्ला येथे महाराजांच्या पुतळ्याची रचना, अभियांत्रिकी, बांधकाम, उभारणी, संचलन आणि देखभाल दुरुस्ती या बाबींचा निविदेत समावेश असून ही निविदा वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाली असून ऑनलाईन उपलब्ध आहे.

पुतळा कोसळल्यानंतर एका महिन्याच्या आतच ही निविदा राज्य शासनाने काढली असून नवीन पुतळ्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आता राज्य सरकारने घाईघाईने ही पावले उचलली आहेत. येत्या १०-१५ दिवसांत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असून त्यापूर्वीच सर्व सोपस्कार अत्यंत घाईगडबडीत उरकण्यात येत आहेत.

राजकोट येथील महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर पुतळा उभारण्यासाठी राज्य शासनाने एक समिती गठित केली होती. त्या समितीच्या अहवालानुसार नवीन पुतळा उभारण्याची प्रक्रिया सरकारने तातडीने सुरू केली आहे.

पुतळा दुर्घटनेनंतर सरकारने चौकशी समिती नेमली होती. शिवाय पुतळा पुन्हा उभारण्यासाठी तज्ज्ञ समिती नियुक्त केली होती. चौकशी अहवाल व समितीच्या शिफारशी जनतेच्या माहितीसाठी जाहीर कराव्यात, अशी मागणी माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दै. ‘नवशक्ति’शी बोलताना केली आहे.

स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या धर्तीवर नवा पुतळा

हा पुतळा गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुतळ्याच्या धर्तीवर उभारण्यात येणार आहे. पुतळा उभारणीच्या कामात कोणत्याही त्रुटी राहू नयेत याची पूर्ण खबरदारी घेण्यात येत आहे. त्यासाठी अनेक अटी-शर्ती घालण्यात आल्या आहेत. पुतळा उभारल्यानंतर त्याची देखभाल, दुरुस्ती त्या ठेकेदाराने करावयाची आहे. सुरुवातीला ३ फुटांचे 'फायबर मॉडेल' तयार करून ते राज्याच्या कला संचालनालयाकडून मंजूर करून घ्यायचे आहे.

पवई येथील 'आयआयटी’च्या मार्गदर्शनाखाली तसेच अनुभव असणाऱ्या शिल्पकारालाच हा पुतळा उभारण्याचे काम देण्यात येणार आहे. याबाबतचा सर्व तपशील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in