काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नवा चेहरा; यशोमती ठाकूर, अमित देशमुख, विश्वजीत कदम यांच्या नावांची चर्चा
मुंबई : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले. निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना हटवून नवीन चेहऱ्यांना संधी द्या, अशी मागणी काँग्रेसमधूनच जोर धरू लागली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी कोण याची अधिकृत घोषणा अद्याप झाली नसली तरी अमित देशमुख, यशोमती ठाकूर आणि विश्वजीत कदम यांच्या नावांची चर्चा असून १५ किंवा १६ जानेवारीला काँग्रेस पक्षाकडून अधिकृत नावाची घोषणा होईल, असे काँग्रेसच्या गोटातून सांगण्यात आले.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जनतेने नाकारले.राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसला फक्त १० जागांवर समाधान मानावे लागले. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पदरी अपयश आल्याने सध्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना हटवून नवीन चेहऱ्यांना प्रदेशाध्यक्षपदी संधी द्या, अशी मागणी काँग्रेस पक्षातून होऊ लागली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असतानाच काँग्रेस पक्षातील नवीन चेहऱ्यांना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे काँग्रेसच्या गोटातून सांगण्यात आले. यात अमित देशमुख, यशोमती ठाकूर आणि विश्वजीत कदम या तीन नावांची जोरदार चर्चा आहे. या तीनपैकी एकावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात येईल, असे काँग्रेसच्या गोटातून सांगण्यात आले. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी कोण असेल याची घोषणा बुधवार किंवा गुरुवारी होईल, असे काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी सांगितले.