
मेघा कुचिक/ पूनम अपराज
मुंबई : रिझर्व्ह बँकेने कारवाई केलेल्या न्यू इंडिया को-ऑप. बँकेत १२२ कोटींची अफरातफर केल्याप्रकरणी बँकेचा महाव्यवस्थापक व लेखा प्रमुख हितेश मेहताला (५७) मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
मेहता याच्या अटकेला सह आयुक्त (आर्थिक गुन्हे शाखा) निशीत मिश्रा यांनी दुजोरा दिला आहे. मेहताला रविवारी सुटीकालीन न्यायालयात हजर केले जाणार आहे.
बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी देवर्षी घोष यांनी शुक्रवारी दादर पोलीस ठाण्यात जाऊन मेहता व अन्य जणांविरोधात अफरातफर केल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर हा गुन्हा मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वळवण्यात आला.
प्रभादेवी व गोरेगाव बँकेच्या शाखेत मेहता व त्याच्या सहकाऱ्यांनी १२२ कोटी रुपयांचा घोटाळा केला. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६ (५), फौजदारी कट ६१ (२) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. न्यू इंडिया को-ऑप. बँकेच्या २८ शाखा असून बहुतांशी मुंबईत आहेत, तर एक पुण्याला व एक गुजरातला आहे.
पोलीस उपायुक्त (आर्थिक गुन्हे शाखा) मंगेश शिंदे म्हणाले की, बँकेच्या सीईओंनी केलेल्या तक्रारीनुसार, हितेश मेहता याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
आरोपीने १२२ कोटी रुपयांचा अपहार केला असून त्याचा तपास सुरू आहे. हितेश याचा जबाब नोंदवला आहे. शुक्रवारी १०.३० वाजण्याच्या सुमारास मेहता याच्या दहिसर येथील आर्यव्रत सोसायटीतील घरावर छापे मारले. तेथे त्याला ताब्यात घेऊन अटक केली.
आर्थिक गुन्हे शाखेच्या सूत्रांनी सांगितले की, बँकेच्या लेखा पुस्तकांची मोजणी केली असता १२२ कोटी रुपयांची तफावत आढळून आली. महाव्यवस्थापकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून बँकेचे लेखा आता न्यायवैज्ञक तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी न्यू इंडिया को-ऑप. बँकेवर कारवाई करून प्रशासक नेमला आहे. बँकेवर अनेक निर्बंध लादले असून पैसे काढण्यावर बंदी घातली आहे.
रिझर्व्ह बँकेने कारवाई केल्याने बँकेच्या खातेदारांमध्ये घबराट उडाली आहे. अनेकांच्या आयुष्याची कमाई बँकेत अडकल्याने खातेदार हवालदिल झाले आहेत. धनादेश टाकल्यानंतर अचानक बँक बंद झाल्याने अनेक खातेदार अडचणीत आले.