एसटी बसस्थानकांना नवा साज! ५८० बस आगार होणार स्वच्छ आणि सुंदर

आपल्या उत्पादनाची विक्री व जाहिरात करता येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे संचालक शेखर चन्ने यांनी दिली
एसटी बसस्थानकांना नवा साज! ५८० बस आगार होणार स्वच्छ आणि सुंदर
ANI

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत राज्यातील ५८० एसटी बसस्थानकांना आता नवा साज मिळणार आहे. एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासह प्रवाशांना दर्जेदार आणि गुणात्मक सेवा देण्याचा उद्देश आहे. बस स्थानकांचे सुशोभीकरण, प्रसाधनगृहांची स्वच्छता आदी कामे करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, ही कामे राज्यांतील बसस्थानक परिसरात असलेल्या लहान मोठे उद्योजक, व्यापारी व सहकारी संस्था यांच्या माध्यमातून बसस्थानकांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. लहान-मोठे उद्योजक व्यापारी व सहकारी संस्था आदींना बसस्थानक परिसरात १० बाय १० फूट जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याठिकाणी संबंधित पात्र ठरणाऱ्यांना आपल्या उत्पादनाची विक्री व जाहिरात करता येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे संचालक शेखर चन्ने यांनी दिली.

राज्याच्या कानाकोपऱ्यात एसटी महामंडळाच्या १४ हजार गाड्या प्रवाशांना सुविधा देत असून दररोज ५५ लाख प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासह बसस्थानकातही दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एसटी महामंडळाने ५६० बस स्थानकांचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. बसस्थानक परिसर आणि टापटीप प्रसाधनगृहे या त्रिसूत्रावर आधारित बसस्थानके व परिसराचे सुशोभीकरण आणि सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय घेतला असून राज्यातील सर्व बसस्थानकांवर स्वखर्चाने स्वच्छता, सुशोभीकरण व सौंदर्यीकरण करणे बंधनकारक आहे. बसस्थानक परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याची पात्रता लहान-मोठे उद्योजक व्यापारी व सहकारी संस्थांची असणार आहे. वर्क ऑर्डर दिल्यानंतर पुढील एक वर्षे ५८० एसटी बसस्थानकांचे सुशोभीकरण करणे संबंधितांची जबाबदारी असणार आहे. एसटी महामंडळाच्या निर्णयामुळे बसस्थानक परिसर स्वच्छ व सुंदर तर होईल आणि नवउद्योजकांना प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास शेखर चन्ने यांनी व्यक्त केला.

असे होणार सुशोभीकरण

* बसस्थानकाच्या मुख्य इमारतीची डागडुजी करणे, विद्युत उपकरणाची दुरुस्ती करून विद्युत दिवे, पंखे सुव्यवस्थित करणे

* बसस्थानकाच्या मुख्य इमारतींची रंगरंगोटी

* बसस्थानकावरील प्रसाधनगृहांची किरकोळ दुरुस्ती

* बसस्थानके स्वच्छ व निर्जंतुक ठेवण्यासाठी योग्य ते नियोजन करणे

* बसस्थानक व परिसराची दैनंदिन स्वच्छता, सुशोभीकरण व सौंदर्यीकरण

फलाटावर गावाचे मार्गदर्शक फलक

* बसस्थानकाच्या प्रत्येक फलाटावर गावाचे मार्गदर्शक फलक

सोयीसुविधांचे नाम फलक

* प्रवाशांना पुरविण्यात येणाऱ्या सेवा सुविधांचे नाम फलक तयार करणे

१० बाय १० फूट जागा !

संबंधित संस्थेला बसस्थानक परिसरात वाहतुकीला अडथळा येणार नाही, अशा ठिकाणी दर्शनी भागात १० बाय १० फूट आकाराची मोकळी जागा उपलब्ध करून देण्यात येईल. त्याठिकाणी संबंधित संस्था स्वखर्चाने तात्पुरता स्टॉल उभारून आपल्या उत्पादन अथवा सेवेची जाहिरात अथवा थेट विक्री करू शकते.

उत्पादनाची व सेवेची जाहिरात!

वाहतूकीला अडथळा होणार नाही, अशा ठिकाणी बसस्थानक परिसरात दर्शनी भागात १० बाय १५ फूट आकाराचे होर्डिंग्स स्वखर्चाने उभारून (संख्या-१) संबंधित कंपनी स्वतःच्या उत्पादनाची अथवा सेवेची जाहिरात करू शकतात.

मुंबई विभागीय बसस्थानकांना नवा साज!

राज्यांतील ५८० बस स्थानकांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. यात मुंबई विभागातील मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला नेहरूनगर, पनवेल व उरण या ५ बस स्थानकांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे.

या संस्थांना बंदी!

कायद्याने जाहिरात करण्यासाठी प्रतिबंधित उत्पादने व सेवा करणाऱ्या समूहाने अमली पदार्थ, तंबाखू, गुटखा, दारू या पदार्थांचे उत्पादक व सेवा करणाऱ्या संस्थांना या प्रक्रियेत नो एन्ट्री दिली जाणार आहे.

असा आहे एसटीचा ताफा

राज्यात एसटी बस स्थानके - ५६०

एसटी गाड्या - १४ हजार

इलेक्ट्रिक गाड्या - ६०

रोजचे प्रवासी - ५५ लाख

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in