
कराड : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरच्या पायथ्याला वसवण्यात येत असलेल्या नवीन महाबळेश्वर पर्यटन प्रकल्पाचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच आढावा घेतला. एमएमआरडीए (मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण) मार्फत या भव्य प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले असून, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, प्रारंभी या प्रकल्पात २३५ गावे समाविष्ट होती, मात्र त्यात वाढ करून आता २९४ गावे या योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत. यामध्ये सातारा, पाटण आणि जावळी तालुक्यांतील गावांचा समावेश आहे.
शिंदे यांनी विशेषतः या भागातील औषधी वनस्पतींचा विचार करून डाबर, पतंजली यांसारख्या कंपन्यांना येथे गुंतवणुकीसाठी आमंत्रित करावे, तसेच वेलनेस सेंटर आणि निसर्गोपचार केंद्रांना प्रोत्साहन द्यावे असे निर्देश दिले. या भागात इको-फ्रेंडली रस्ते, नवीन धबधबे विकसित करावेत, जेणेकरून स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी तापोळा येथील उत्तेश्वर मंदिर, तसेच उत्तेश्वर रोपवे प्रकल्पाची प्रगतीही त्यांनी जाणून घेतली आणि या कामांना वेग द्यावा, असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. एमएसआरडीसीला शासनाकडून मिळालेल्या विविध प्रकल्पांची अंमलबजावणी दर्जेदार व वेळेत होणे अपेक्षित असून, सिडको आणि एमएमआरडीएप्रमाणे झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात सहभाग घ्यावा, असेही शिंदे यांनी सूचित केले. सुरू असलेल्या प्रकल्पांमध्ये राडारोडा दूर करून बेरिकेड्स लावावेत, पुलाखाली सुशोभीकरणासाठी झाडे लावावीत, आणि पावसाळ्यापूर्वीची कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, असे निर्देशही त्यांनी दिले.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
एकूण क्षेत्रफळ : १,१५,३०० हेक्टर
समाविष्ट गावे:
सातारा तालुका – १०१ गावे
पाटण तालुका – १९३ गावे
जावळी तालुका – ४९ गावे
उंची: सुमारे १२०० मीटर (समुद्र सपाटीपासून)
निसर्ग वैशिष्ट्ये: सोळशी, उरमोडी, कांदाटी उपनद्या, घनदाट जंगल, धबधबे, वन्यजीव, तलाव, ऐतिहासिक वास्तू या सर्व बाबी लक्षात घेता, नवीन महाबळेश्वर हा प्रकल्प एक आदर्श गिरीस्थान पर्यटनस्थळ म्हणून विकसित होण्याच्या दिशेने पुढे जात असल्याचे स्पष्ट होत आहे.