राज्यातील आठ शहरांमध्ये नवे महापौर; नागपूर, संभाजीनगरसह ६ शहरांत भाजपचा महापौर

राज्यातील आठ महापालिकांमध्ये शुक्रवारी महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक पार पडली. यात नागपूर व छत्रपती संभाजीनगरसह ६ शहरांत सत्ताधारी भाजप, तर एका महापालिकेत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर खुर्चीत बसला आहे. उर्वरित एका ठिकाणी सध्या महापौर निवडीची प्रक्रिया सुरू आहे.
राज्यातील आठ शहरांमध्ये नवे महापौर; नागपूर, संभाजीनगरसह ६ शहरांत भाजपचा महापौर
राज्यातील आठ शहरांमध्ये नवे महापौर; नागपूर, संभाजीनगरसह ६ शहरांत भाजपचा महापौर
Published on

मुंबई : राज्यातील आठ महापालिकांमध्ये शुक्रवारी महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक पार पडली. यात नागपूर व छत्रपती संभाजीनगरसह ६ शहरांत सत्ताधारी भाजप, तर एका महापालिकेत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर खुर्चीत बसला आहे. उर्वरित एका ठिकाणी सध्या महापौर निवडीची प्रक्रिया सुरू आहे.

राज्यातील जळगाव, धुळे, कोल्हापूर, पिंपरी-चिंचवड, नागपूर, अमरावती, सोलापूर व नाशिक या ८ मोठ्या महापालिकांमध्ये शुक्रवारी महापौर निवडीची प्रक्रिया पार पडली. यात सोलापूर, जळगाव व अहिल्यानगर येथील चुरशीच्या वाटणाऱ्या निवडणुका ऐनवेळी बिनविरोध झाल्या. तर नागपूर व धुळ्यात भाजपने मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला.

सोलापूर महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या विनायक कोंड्याल यांची बिनविरोध निवड झाली. येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेना व एमआयएमच्या उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतल्यामुळे कोंड्याल यांचा मार्ग मोकळा झाला. जळगाव महापालिकेत भाजपच्या दीपमाला काळे यांची महापौरपदी वर्णी लागली, तर शिवसेनेच्या शिंदे गटाचे मनोज चौधरी यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली. दीपमाला काळे या जळगाव महापालिकेच्या १७ व्या महापौर ठरल्या आहेत.

नागपुरात भाजपच्या नीता ठाकरे महापौर

नागपूर महापालिकेत भाजपच्या नीता ठाकरे यांनी तब्बल १०४ मते मिळवत काँग्रेसच्या स्नेहल ठाकरे यांचा पराभव केला आहे. या ठिकाणी झालेल्या निवडणुकीत नीता ठाकरे यांना १०४, तर स्नेहल ठाकरे यांना ३६ मते पडली. अकरा मतदारांनी तटस्थ भूमिका बजावली. परिणामी, नीता ठाकरे यांचा मोठ्या मतफरकाने विजय झाला. उपमहापौरपदी भाजपच्याच लीला हाथीबेड यांची नियुक्ती झाली आहे.

धुळे महापालिकेत सत्ताधारी महायुतीच्या घटकपक्षांत दुरंगी लढत दिसून आली. येथे भाजपच्या मायादेवी परदेशी यांनी ५० मते मिळवत महापौरपदी विजय मिळवला. तर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या संयुक्त उमेदवाराला अवघ्या १३ मतांवर समाधान मानावे लागले. उपमहापौरपदी भाजपच्याच ज्योत्स्ना पाटील निवडून आल्या.

छत्रपती संभाजीनगरात समीर राजूरकर महापौर

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या महापौरपदासाठी समीर राजूरकर व उपमहापौरपदासाठी राजेंद्र जंजाळ यांचे नाव निश्चित झाले आहे. येथे राजेंद्र जंजाळ यांच्या नावाला विरोध होण्याची शक्यता आहे. यामुळे उपमहापौरपदाविषयी सध्या मोठी संभ्रमावस्था आहे. पण सूत्रांच्या मते, त्यांच्या नावाच्या घोषणेची केवळ औपचारिकता शिल्लक राहिली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतही भाजपच्या शर्मिला बाबर यांचे नाव महापौरपदासाठी निश्चित झाले आहे. येथेही महापौर निवडीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. अहिल्यानगरमध्ये महापौरपदी ज्योती गाडे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तर उपमहापौरपदी भाजपचे धनंजय जाधव निवडून आले. नाशिक महापालिकेत भाजपच्या हिमगौरी आडके महापौरपदी, तर शिवसेनेचे विलास शिंदे उपमहापौरपदी निवडून आले.

नांदेडमध्ये पहिल्यांदाच भाजपचा महापौर

नांदेड महापालिकेत पहिल्यांदाच भाजपचा महापौर विराजमान झाला आहे. नांदेड महापालिकेत ८१ पैकी ४५ जागा जिंकत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. येथे भाजपने महापौरपदासाठी कविता मुळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असून, उपमहापौरपदासाठी दीपकसिंह रावत यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in