महालक्ष्मी एक्स्प्रेससाठी नवे पॅसेंजर कोच, खासदार धनंजय महाडिक यांच्या मागणीला यश

खासदार धनंजय महाडिक यांनी सातत्याने रेल्वे मंत्रालयाकडे आणि रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा करत, महालक्ष्मी एक्स्प्रेसचे प्रवासी डबे नवे असावेत, अशी मागणी केली होती.
महालक्ष्मी एक्स्प्रेससाठी नवे पॅसेंजर कोच,
खासदार धनंजय महाडिक यांच्या मागणीला यश
Published on

कोल्हापूर : मुंबई - कोल्हापूर या मार्गावर रोज धावणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेसला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद असतो. महालक्ष्मी एक्स्प्रेस नेहमीच ओव्हरफुल असते; मात्र गेल्या काही वर्षात महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या प्रवासी डब्यांची अवस्था अत्यंत केविलवाणी बनली होती. महालक्ष्मी एक्स्प्रेसचे प्रवासी कोचेस अत्यंत जुने झाले होते. रेल्वे डब्यातील खुर्च्या, झोपण्याचे बर्थ यासह सर्वच सामग्री जुनी झाल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. शिवाय अनेक डब्यांमध्ये अस्वच्छता असायची. या पार्श्वभूमीवर खासदार धनंजय महाडिक यांनी सातत्याने रेल्वे मंत्रालयाकडे आणि रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा करत, महालक्ष्मी एक्स्प्रेसचे प्रवासी डबे नवे असावेत, अशी मागणी केली होती. या मागणीला यश आले असून, रेल्वे मंत्रालयाकडून खासदार महाडिक यांना महत्त्वाची माहिती कळवण्यात आली आहे. त्यानुसार, गुरुवार, २५ जानेवारीपासून, कोल्हापूर- मुंबई - कोल्हापूर या मार्गावर धावणाऱ्या महालक्ष्मी एक्सप्रेसला नवे, आधुनिक बनावटीचे सुसज्ज प्रवासी कोच जोडले जातील.

त्यामुळे महालक्ष्मी एक्स्प्रेसने प्रवास करणे अधिक सुखकर आणि आरामदायी होणार आहे. कोल्हापूरकरांच्या सोयीसाठी खासदार महाडिक यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, २५ जानेवारीपासून नव्या रूपात महालक्ष्मी एक्स्प्रेस धावणार आहे. कोल्हापूरकरांची ही मागणी मान्य केल्याबद्दल खासदार महाडिक यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जाहीर आभार व्यक्त केले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in