
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. त्यांचा मुलगा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते झीशान सिद्दीकी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात उबाठा नेते अनिल परब आणि भाजप नेते मोहित कंबोज यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. तर बिष्णोई गँग बाबत झीशान सिद्दीकी यांनी काहीच म्हटले नसल्याने वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले आहेत. तसेच राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. झीशान सिद्दीकींनी बाबा सिद्दीकींच्या हत्येमागे वांद्रेतील झोपटपट्टी पुनर्विकास प्रकल्पाविषयीच्या वादाचा संबंध असू शकतो, असा दावा केला असून त्या दृष्टीकोनातूनही तपास करावा, अशी मागणी केली आहे.
झीशान सिद्दीकींनी त्यांच्या जबाबात नेमके काय म्हटले आहे?
झीशान सिद्दीकी यांनी बाबा सिद्दीकी यांच्या हत्या झाली त्यादिवशीचा त्यांच्या दैनंदिनीचा घटनाक्रम सांगितला आहे. तसेच त्यांनी बाबा सिद्दीकी हे दररोज डायरी लिहित होते. या डायरीत त्यांनी वांद्रे पूर्व झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पासंबंधित विकासक तसेच बिल्डरच्या नावांबाबतचा उत्लेख केला आहे.
या प्रकल्पासंबंधी भाजप नेते मोहित कंबोज यांनी बाबा सिद्दीकी यांचा खून झाला त्या दिवशी सायंकाळी व्हॉट्स अप वर संपर्क साधला होता आणि त्यांच्या भेटीची वेळ मागितली होती, असे आपल्याला नंतर कळाल्याची माहिती झीशान यांनी पोलिसांत दिलेल्या जबाबात दिली आहे.
याच प्रकल्पासंबंधित उबाठा नेते अनिल परब यांच्याही नावाचा उल्लेख झीशान यांनी केला आहे. अनिल परब यांनी ज्ञानेश्वरनगर प्रकल्पात ज्यांची घरे जाणार आहेत त्या लोकांची बैठक घेतली होती. या बैठकीत विकासकांनी झोपडपट्टीधारकांना त्याच ठिकाणी घर मिळेल, असे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात त्यांची दिशाभूल करण्यात येत होती. त्यांना त्याच ठिकाणी नाही तर मुंबईत दुसरीकडे कुठेही घर मिळेल, असे करारात म्हटले होते. त्यासंदर्भात लोकांच्या तक्रारी माझ्यापर्यंत आल्या होत्या, असे झीशान यांनी म्हटले आहे.
माझ्यावर खोटा गुन्हा दाखल
झीशान यांनी संत ज्ञानेश्वरनगर पुनर्विकास प्रकल्पाविषयी माहिती देताना म्हटले आहे, ''मी नागरिकांची बाजू उचलून धरल्याने माझ्यावर खरेवाडी पोलीस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. उबाठा नेते अनिल परब यांनी या ठिकाणच्या विकास आराखड्याच्या सर्वेक्षणापूर्वी महासभेच्या ठरावासाठी येथीली लोकांची बैठक बोलावली. या बैठकीत त्यांनी येथील लोकांना पुनर्विकास प्रकल्पासाठी मान्यता देण्याचे आवाहन केले होते. परब यांच्या बैठकीनंतर मी पुन्हा तेथील लोकांची बैठक घेतली. मी त्यांना सांगितले की, तुम्ही कोणताही बिल्डर निवडू शकता मात्र, आधी कागदपत्रे वाचा आणि नंतरच कोणत्याही दबावाशिवाय त्यावर सही करा. मात्र, यानंतर माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला,''असे झीशान यांनी म्हटले आहे.
विकसक पृथ्वी चव्हाणाची बाबा सिद्दीकींसोबत असभ्य भाषा
विकसक पृथ्वी चव्हाण यांनी बाबा सिद्दीकी यांच्याशी बोलताना असभ्य भाषा वापरली. त्यांनी मला वाटेल ते मी करेन, असं पृथ्वी चव्हाण यांनी म्हटल्याचा उल्लेख झीशान यांनी केला आहे. पृथ्वी चव्हाण शिवाय शाहिद बलवा, शिवालिक व्हेंचर्स, अदानी, नबील पटेल, विनोद गोएंका आणि ओंकार बिल्डर्स या आणखी काही विकसकांच्या नावाचाही उल्लेख झीशान यांनी केला आहे.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा घटनाक्रम आणि आतापर्यंतचा तपास
बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर रोजी सायंकाळी मुलगा झीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाच्या बाहेर तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. हत्या झाल्यानंतर बिष्णोई गँगने समोरून या हत्येची जबाबदारी घेतली होती. पोलिसांनी याप्रकरणी 4500 पानी आरोपपत्र दाखल केले आहे. यात 26 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अनमोल बिष्णोईला फरार आरोपी घोषित केले आहे.
त्यानंतर आता झीशान यांच्या जबाबात बिष्णोई गँगचा कोणताही उल्लेख करण्यात आला नसून त्यांनी बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात वांद्रे पूर्व झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाच्या वादाचा संबंध असू शकतो, असा दावा केला आहे. तसेच या दृष्टीकोनातूनही तपास करावा, अशी मागणी केली आहे.