
कराड : जावळी तालुक्यातील रामवाडी येथे शासकीय योजनांच्या माध्यमातून अफाट माया मिळवलेला आणि बोगस बिले अदा करून शासनाची फसवणूक करीत आर्थिक सक्षम झालेला प्रती ' वाल्मीक कराड ' उदयाला आल्याचे चित्र असून या प्रती कराडच्या विरोधात खुद्द रामवाडी गावच्या सरपंचानीच आवाज उठवला आहे. श्रीराम सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून झालेला भ्रष्टाचार बाहेर काढल्याने या सरपंचांना हा प्रती कराड हा दमदाटी करून दबाव आणण्याचा प्रयत्न करीत असल्याची धक्कादायक माहितीही गलगले यांनी माध्यमांसमोर मांडली आहे.
याबाबत रामवाडी गावचे सरपंच श्रीरंग गलगले यांनी पत्रकार परिषद घेऊन श्रीराम सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष सुनील पोफळे यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे सादर करून वाचनालयाची खोटी बिले शासन दरबारी सादर केल्याचा दावा केला आहे. शासनाला गंडा घातला असल्याचा आरोप करून पोफळे यांच्या कारभाराची चौकशी करून त्यांचेवर तातडीने कारवाईची मागणी गलगले यांनी केली आहे. तसे न झाल्यास आपण न्यायासाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशाराही सरपंच गलगले यांनी दिला आहे.
या फसवणुकीबाबत सांगताना श्रीरंग गलगले म्हणाले, स्वतःच्याच घरात सुनील पोफळे यांनी वाचनालय थाटले. सर्व पदाधिकारी घरातीलच, वाचनालय घरातच, भाडे स्वतःलाच, ग्रंथपाल घरातीलच, वाचक सुद्धा घरातीलच असे एक कौटुंबिक वाचनालय सुरू झाले.
‘प्रति कराड’चे कारनामे
या प्रति कराडने अनेक शासकीय योजनांच्या माध्यमातून शासनाची लूट केली असल्याचा आरोप गलगले यांनी केला आहे. यामध्ये पाणलोट समितीचे सचिव पद सांभाळताना सुनील पोफळे यांनी पाचगावांसाठी असणारी पाणलोटमधील सुमारे ५० लाख रुपयांचे बंधारे लाटले आहेत. हे बंधारे या पाच गावात कुठेही अस्तित्वात नाहीत. तसेच समाजकल्याण विभागातून बचत गटाच्या माध्यमातून दुसऱ्याचे नाव वापरुन ट्रॅक्टर खरेदी केला आहे. तसेच कुक्कुट पालन नसतानाही बोगस कागदपत्रे दाखवून अनुदान घेतले आहे. असाच द्रोण पत्रावळ्या मशीनचा ही झोल सुनील यांचे नावावर आहे. ग्रंथालय अधिकारी सुद्धा अशा फसव्या आणि बोगस वाचनालय अध्यक्षाला पाठीशी घालत असल्याचे चित्र आहे. हा अध्यक्ष त्यांना खुश करून अनुदान लाटत आहे. माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवताना हे अधिकारी सरपंच गलगले यांना उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.