
सुजित ताजणे/ छत्रपती संभाजीनगर
तथागत गौतम बुद्ध यांच्या पावन स्पर्शाने पावन झालेल्या भूमिकडे देश विदेशातील पर्यटक भारतात येत असतात. अशातच संपूर्ण जग नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतानिमित्त येथे येत असतात. कोरोनाचा भयावह अनुभव मागे टाकत पर्यटकाच्या उत्साहाला भर येत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे निसर्गरम्य पर्यटनस्थळाकडे पर्यटकांची पाऊले आपोआपच वळत असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ सर्वच पर्यटकांना उच्च दर्जाची सेवा आणि आरोग्यपूर्ण सुविधा देण्याबरोबरच निखळ पर्यटनाचा, निसर्गाचा आणि अप्रतिम खाद्यपदार्थाचा आस्वाद देण्यासाठी सज्ज झाले आहेत.
नव वर्षाच्या स्वागताची तयारी करताना नाताळ सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. त्यानंतर नव वर्षाच्या स्वागतासाठी येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी महामंडळाच्या माध्यमातून निवासाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. पर्यटक निवासांमध्ये निसर्गाचे भान ठेवून जबाबदारीने पर्यटन करण्याची विनंती पर्यटक महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
पर्यटकांना पर्यटन विषयक सुविधा, खाद्यपदार्थांची माहीती, आसपासच्या निसर्गाची माहीती, स्थानिक खेळ, परंपरा, सांस्कृतिक कार्यक्रम, वन्यजीव, वृक्षवल्ली, तसेच महामंडळामार्फत पर्यटकांसाठी घेण्यात येणारी खबरदारी, सुरक्षिततेच्या उपाययोजना यांची माहिती वेबसाईट, फेसबुक आणि व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून देण्यात येत आहे. तथापि प्रत्यक्षात अनुभवात्मक पर्यटनाचा अनुभव पर्यटक निवासांमध्ये देण्याचा महामंडळाचा मानस आहे. आगामी डिसेंबर आणि नव वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक महामंडळाच्या पर्यटक निवासांना प्राधान्य देण्यात येत आहे. आताच महामंडळाच्या पर्यटक निवासांचे ९५ टक्के आरक्षण झाले आहे.
दरम्यान, पर्यटकांना स्वच्छ आणि रमणीय समुद्रकिनारे, ऐतिहासिक गड-किल्ले, प्राचीन मंदीरे आणि संस्कृती, हिरवागार निसर्ग, अप्रतिम खाद्यपदार्थ यांची मेजवानी देण्यासाठी महामंडळ आतुरतेने वाट पहात होते. महामंडळाची आणि पर्यटकांचीही आतुरता आता संपली असून सर्व पर्यटक निवासे हाऊसफुल झाल्याचे दिसून येत आहे. सध्या रमणीय समुद्रकिनारे आणि थंड हवेची ठिकाणे पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरत आहेत.
प्री-वेडिंग आणि डेस्टिनेशन वेडिंगची सोय
पर्यटकांच्या सुरक्षेस सर्वोच्च प्राधान्य देताना शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करीत उपहारगृह, रिझॉर्ट आणि अनुषंगिक बाबींची तसेच परिसराची काटेकारेपणे स्वच्छता आणि पर्यटकांना त्याच्या खोल्यांपर्यंत अल्पोपहार, जेवण आणि अन्य अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात येत आहेत. तसेच शासनाच्या सर्व नियमांच्या अधीन राहून प्री -वेडींग फोटोशुट आणि डेस्टिनेशन वेडींग चीही सोय करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे आवाहन
महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा, महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती जपत, तीर्थक्षेत्रांना भेट देऊन आध्यात्मिक वारसा तर जंगल सफारीतून साहसी अनुभव अशा अनेक पैलूंचा आणि निवांत समुद्रकिनारे व मोहक पर्वतरांगांमधील शांतता अनुभवण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पर्यटकांना साद घालीत आहे. पर्यटनाबरोबरच पर्यावरण आणि भारतीय संस्कृतीचा ठेवा जपत पर्यटनाचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी केले आहे.
ऑनलाईन बुकिंग
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची सर्व पर्यटक निवासांचे आरक्षण सुरू असून www.mtdc.co या वेबसाईटवर ऑनलाईन बुकिंगही सुरू करण्यात आले आहे. आगामी काळात पर्यटकांचा ओढा लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणावर सवलती देण्यात येणार असून पर्यटकांसाठी नाविन्यपूर्ण अशा 'वर्क फ्रॉम नेचर आणि वर्क विथ नेचर' या संकल्पनेअंतर्गत काही रिझॉर्टवर वायफाय सुविधा पुरविण्यात येत आहेत. महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली नाताळ आणि नववर्षाच्या स्वागताचे सर्वत्र नियोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाव्दारे एकूण ३० निवासे व उपहारगृहाचे नियोजन करण्यात आले आहे. केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून असंख्य अतिथी पर्यटक निवासाचा लाभ घेण्यासाठी येत असतात. ‘अतिथी देवो भव’ या नीतीचा अवलंब करत येणाऱ्या पर्यटकांना निवासामधील कर्मचाऱ्यांव्दारे उत्तम सोयीसुविधा पुरविल्या जातात.
- मनोज कुमार सुर्यवंशी, (भा.प्र.से.) व्यवस्थापकीय संचालक महामंडळ