
पुणे : थंड हवेचे पर्यटनस्थळ म्हणून ख्याती असलेल्या लोणावळा खंडाळ्यासह मावळातील विविध पर्यटन स्थळे नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी लोणावळ्यासह मावळातील हॉटेल्स, व्हिला, बंगले, टेंट हाऊसची जोरदार बुकिंग्ज झाली आहेत. सेकंडहोम असलेले बंगले व मावळातील जलाशयांच्या किनाऱ्यांवर असलेल्या कृषी पर्यटन केंद्रावरील टेंटची बुकिंगही हाऊसफुल्ल झाली आहे. एकीकडे ही तयारी असताना नववर्षाच्या स्वागतासाठी होणारी पर्यटकांची गर्दी लक्षात घेऊन पर्यटकांचे लोणावळ्यातील पर्यटनस्थळ असलेले टायगर व लाइन्स पॉइंट्स हे वन्यजीव आणि जैवविविधतेच्या सुरक्षेच्या कारणास्तव ३१ डिसेंबर व एक जानेवारीला बंद ठेवण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. यामुळे स्थानिक व्यावसायिकांसह पर्यटकांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.
सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटननगरी लोणावळा, खंडाळासह मावळातील पर्यटनस्थळे सज्ज झाली आहेत. येथील हॉटेल्स, रिसॉर्ट, फार्म हाऊस, खासगी बंगले, सेनेटोरियम व कृषी पर्यटन केंद्रावरील टेंटची बुकिंग हाऊसफुल्ल झाली आहे. लोणावळा व मावळातील पर्यटन स्थळांवर पर्यटकांच्या होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी लोणावळा शहर व लोणावळा ग्रामीण, कामशेत व वडगाव मावळ पोलीस सज्ज झाले आहेत. यासाठी अतिरिक्त पोलीस फौजफाटा मागविण्यात आला आहे.
दोन दिवस टायगर व लायन्स पॉइंट्स पर्यटकांसाठी बंद
लोणावळ्यातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या टायगर व लायन्स या दोन्ही गिरी पॉइंट्सवर पर्यटकांची तिन्ही ऋतूत विशेषतः पावसाळ्यात नेहमीच गर्दी असते. वर्षभरातील विकेंड व या विकेंडला जोडून येणाऱ्या सलग सुट्ट्यांच्या दिवशी तर मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. या दोन्ही पॉइंट्सचा परिसर हा जंगलमय असून, तेथे मोठ्या प्रमाणात जैवविविधता व वन्य जीवांचे वास्तव्य आहे. मागील काही वर्षांपासून काही पर्यटकांच्या हुल्लडबाजी, गैरवर्तन आणि अनुचित प्रकारांमध्ये येथील जैवविविधतेसह वन्य जीवांवर परिणाम होऊ लागला आहे. यामुळे थर्टी फर्स्ट व नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पर्यटकांच्या होणाऱ्या संभाव्य गर्दीचा दूरगामी विचार करून येथील जैवविविधतेसह वन्य जीवांच्या संरक्षणाच्या दृष्टीने ३१ डिसेंबर व एक जानेवारी असे दोन दिवस टायगर व लायन्स पॉइंट्स पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय वडगाव मावळ वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी घेतला आहे. या संदर्भात या विभागातील सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी व प्रशासनाने सर्व आदेशांचे पालन करावे, असे निर्देश देण्यात आले आहे. परिसरातील पर्यटनस्थळांवर कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार कोणाकडून होणार नाहीत, याची योग्य ती खबरदारी वन विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी संबंधित पोलीस प्रशासनाच्या मदतीने घेऊन योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशाही सूचना करण्यात आल्या आहेत.