वासोटा किल्ला पर्यटकांच्‍या वर्दळीने बहरला; हॉटेल्‍सवरही मुक्‍कामासाठी गर्दी

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर ३० डिसेंबरपासून सलग तीन दिवस वासोटा किल्ला पर्यटनासाठी बंद राहणार आहे.
वासोटा किल्ला पर्यटकांच्‍या वर्दळीने बहरला; हॉटेल्‍सवरही मुक्‍कामासाठी गर्दी
Published on

कराड : नववर्षाच्या पार्श्वभूमीवर ३० डिसेंबरपासून सलग तीन दिवस वासोटा किल्ला पर्यटनासाठी बंद राहणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील ट्रेकर्स, पर्यटकांना भुरळ घालणारा वासोटा किल्‍ला शनिवारी आणि रविवारी पर्यटकांच्या गर्दीने बहरून गेला होता. लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत शेकडो पर्यटकांनी वासोटा पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटला. यासाठी तेथील भैरवनाथ बोट क्लब बामणोली, ब्राविमश्वर बोट क्लब शेंबडी, केदारेश्वर बोट क्लब मुनावळे या तीन बोट क्लबमधील बोटीतून शेकडो पर्यटकांनी किल्ले वासोट्याचा ट्रेक केला.

सध्या थंडीचा हंगाम असल्याने वासोटा किल्ला पाहण्यासाठी शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी पर्यटक बामणोली, शेंबडी, मुनावळे या संपूर्ण परिसरामध्ये आदल्या दिवशी मुक्कामासाठी गर्दी करत असून हॉटेल, तंबूंचे बुकिंग महिना, आठवडाभर अगोदरच होत आहे. त्यातच तंबूमध्‍ये राहण्याची मजा काही वेगळीच असल्‍याने, त्‍याजवळच शेकोटी करून त्याभोवती कराओके अशी कडाक्याच्या थंडीतही शेकोटीची ऊब घेत गाण्यांची मैफल रंगवत पर्यटक रात्री जागून काढत आहेत.

सह्याद्रीनगर, कोळघर येथे तंबू लावून मुक्काम

वासोटा परिसरामध्ये मुक्कामाची सोय अपुरी पडल्यानंतर पर्यटक सह्याद्रीनगर, कोळघर, अंधारी, फळणी, उंबरेवाडी, कास या परिसरात देखील तंबू लावून मुक्कामाचा आनंद लुटत आहेत. बामणोली, शेंबडी, मुनावळे या ठिकाणाहून तास, दीड तासाचा बोटीचा प्रवास करून पर्यटक किल्ल्याच्या पायथ्याला गेल्यावर घनदाट जंगलातून ट्रेकला सुरुवात करतात. या घनदाट जंगलातून जाताना वेगवेगळ्या पशू-पक्ष्यांचे आवाज ऐकत निसर्गसौंदर्याचा आनंद लुटत आहेत. किल्ल्यावर गेल्यानंतर तेथील निसर्गसौंदर्य काही औरच अनुभवता येते. पर्यटकांमध्ये प्रामुख्याने कॉलेज युवक-युवती, नोकरदार, व्यावसायिक, व्यापारी आदी लोक मोठ्या प्रमाणात येत असतात.

logo
marathi.freepressjournal.in