ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाणार; नार्वेकरांकडून लोकशाहीची हत्या- उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

पुढील लढा आता सुप्रीम कोर्टात चालणार आहे. शिंदेंची शिवसेना ही शिवसेना होऊच शकत नाही कारण शिंदे आणि शिवसेना हे नाते तुटले आहे.
ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाणार; नार्वेकरांकडून लोकशाहीची हत्या- उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
PM

विशेष प्रतिनिधी/मुंबई

गेल्या दीड वर्षापासून सुरू असलेल्या शिवसेनेतील सत्तासंघर्षाचा बुधवारी विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात निकाल लागला. शिवसेना ही शिंदे गटाचीच असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी सत्तासंघर्षाचा निकाल देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी लोकशाहीची हत्या केली असून, या निकालाविरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे घोषित केले. त्यामुळे यापुढील लढा आता सुप्रीम कोर्टात चालणार आहे. शिंदेंची शिवसेना ही शिवसेना होऊच शकत नाही कारण शिंदे आणि शिवसेना हे नाते तुटले आहे. आम्ही उबाठा नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे आहोत. या अन्यायाविरोधात मी उभा ठाकलेलो आहे. हा निकाल म्हणजे मिलिभगत आहे. मॅचफिक्सिंग आहे. या विरोधात आता सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोतच. न्यायालयाने निवडणूकीआधी दूध का दूध पानी का पानी करावे, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. मातोश्री येथे पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांनी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालावर नाराजी व्यक्त केली.

ठाकरे म्हणाले, ‘‘सर्वोच्च न्यायालयाचे सर्व निर्देश यांनी धाब्यावर बसविले. आमच्या मागे महाशक्ती आहे, सर्वोच्च न्यायालयालाही हे जुमानत नाहीत, हे आजच्या निकालावरून दिसले. आमची घटनाच ग्राह्य धरत नाही तर आम्हाला अपात्र का नाही केले. शिवसेना कोणाची, हे महाराष्ट्रातील लहान मूलही सांगू शकते. शिवसेना कोणाची, हा निवडणूक आयोगाचा निर्णयच चुकीचा आहे. त्याला आम्ही सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. विधानसभाध्यक्ष म्हणून जे न्यायिक संरक्षण असते, त्याचा त्यांनी गैरफायदा घेतला आहे. त्यांच्याविरूद्ध अवमान याचिका दाखल करता येत नाही, पण सर्वोच्च न्यायालय काही करू शकेल का, हे पहावे लागेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

‘‘२०१८ ची नियुक्ती त्यांना मान्य नाही, ते म्हणतात. तो निर्णय द्यायचा त्यांचा अधिकारच नाही. आता जे निवडून आले ते कोणाच्या चिन्हावर निवडून आले. त्यांचा हेतू हा वेळकाढूपणाचा होता. आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोतच. पण, निवडणुकीच्या आधी दूध का दूध पानी का पानी करायला हवे. शिवसेना काही संपत नाही आणि संपणारही नाही. मिंधे किंवा गद्दाराची शिवसेना महाराष्ट्रातील जनता मानणार नाही. पक्षात घेतलेल्या निवडणूका हे निवडणूक आयोगाला वेळोवेळी सादर केले आहे. शिंदेंची शिवसेना ही शिवसेना होउच शकत नाही कारण शिंदे आणि शिवसेना हे नाते तुटले आहे. त्यांची मिलिभगत होती. तुमचे सर्व मॅचफिक्सिंग होते. सर्वोच्च न्यायालयाच्या चौकटीच्या बाहेर जात हा निर्णय घेतला आहे. हा निकाल सर्वोच्च न्यायालय आणि जनतेच्या न्यायालयात टिकणार नाही.

उबाठा नव्हे उद्धव बाळासाहेब ठाकरे

‘‘आम्ही उबाठा नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. या अन्यायाविरोधात मी उभा ठाकलेलो आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात सुनिल प्रभू आणि अजय चौधरी यांची नेमणूक ग्राह्य धरली होती. २०१३ साली मी पहिल्यांदा जेव्हा पक्षप्रमुख झालो तेव्हा निवडणूक आयोगाला घटना सादर केली आहे. पक्षांतरबंदी कायदा अधिक भक्कम करण्याची संधी होती मात्र अध्यक्षांनी तर राजमार्गच खुला केला आहे. त्यांना पक्ष बदलण्याचा अनुभव आहे असा टोलाही त्यांनी लगावला. सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेल्या चौकटीच्या बाहेर जाउन यांनी काम केले,’’ असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in