पुण्यात निखिल वागळेंवर भाजप कार्यकर्त्यांचा हल्ला; ‘निर्भय बनो’ कार्यक्रमाला विरोध

भाजपकडून होत असलेल्या कडाडून विरोधानंतरही निखिल वागळे कार्यक्रमस्थळी पोहोचले.
पुण्यात निखिल वागळेंवर भाजप कार्यकर्त्यांचा हल्ला; ‘निर्भय बनो’ कार्यक्रमाला विरोध

पुणे : ‘निर्भय बनो’ कार्यक्रमासाठी आलेल्या पत्रकार निखिल वागळे यांच्यावर पोलिस बंदोबस्त असतानाही भाजप कार्यकर्त्यांनी प्राणघातक हल्ला केला. भाजपकडून कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिल्यानंतर निखिल वागळे यांना निर्भय बनो कार्यक्रमासाठी पोहोचण्यासाठी पोलिस बंदोबस्त देण्यात आला. मात्र, कार्यक्रमाला पोहोचेपर्यंत पोलीस बंदोबस्त असतानाही चारवेळा गाडी फोडण्यात आली. इतकेच नव्हे, तर शाईफेक तसेच अंडीफेक करण्यात आली.

भाजपकडून होत असलेल्या कडाडून विरोधानंतरही निखिल वागळे कार्यक्रमस्थळी पोहोचले. यावेळी निर्भय बनो कार्यक्रमाासाठी आलेल्या नागरिकांनी वागळे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला. यामध्ये काही तरुणी सुद्धा जखमी झाल्या आहेत. भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात वागळे यांच्या अंगावरही शाई पडली. पोलीस बंदोबंदास्त प्रवास होत असतानाही गाडी चारी बाजूने फोडण्यात आली आहे. भाजपकडून विरोध केल्यानंतर महाविकास आघाडीकडून वागळे यांचा कार्यक्रम होणारच, असा पवित्रा घेतला. विटासुद्धा फेकून मारण्यात आला, असा आरोप महिला कार्यकर्त्यांनी केला. कपडे फाडण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप काही महिलांनी केला. निर्भय बनो कार्यक्रमाचे पुण्यातील साने गुरुजी हॉलमधे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या आधी भाषण करणाऱ्या पत्रकार निखिल वागळे यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ट्विट केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे शहर भाजपने कार्यक्रमास विरोध केल्यास आपण या कार्यक्रमास सुरक्षा पुरवू, अशी भूमिका काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्त्यांनी घेत कार्यक्रमाच्या ठिकाणी जमले होते. यामध्ये आमदार रवींद्र धंगेकर, मोहन जोशी, संजय मोरे या महाविकास आघाडीच्या नेत्यांचा समावेश आहे. दुसरीकडे, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखाली भाजपकडून आंदोलन करण्यात आले.

दोषींवर कडक कारवाई-पवार

निखिल वागळे यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्यानंतर पुण्यामध्येच असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आत्ताच हा प्रकार झाल्याचं मला समजल्याची प्रतिक्रिया दिली. मी तेथील पोलीस आयुक्तांशी लगेच बोलणार असून कडक कारवाई करायला सांगणार आहे. जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया दिली.

logo
marathi.freepressjournal.in