
पुणे : पुणे जिल्ह्यातील युवासेनेचे जिल्हाध्यक्ष निलेश घारे यांच्या गाडीवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेचे गूढ उकलले असून, हा गोळीबार घारे यांनीच स्वतः घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शस्त्र परवाना मिळावा आणि पोलीस संरक्षण मिळावे यासाठी त्यांनी हा बनाव रचल्याचा संशय वारजे पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी वारजे पोलिसांनी काल रात्री उशिरा तिघांना ताब्यात घेतले असून, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार घारे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
१९ मे रोजी रात्री १२ वाजताच्या सुमारास पुण्यातील वारजे माळवाडी भागातील गणपती माथा परिसरात निलेश घारे यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ त्यांच्या वाहनावर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला होता. सुदैवाने घारे त्यावेळी गाडीत नसल्याने त्यांना कोणतीही इजा झाली नाही. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती आणि वारजे पोलिसांसह गुन्हे शाखेचे पथक या प्रकरणाचा तपास करत होते.
रविवारी रात्री उशिरा वारजे पोलिसांनी सचिन गोळे, शुभम खेमणार आणि अजय उर्फ बगली सकपाळ या तिघांना वारजे परिसरातून ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनीच हा गोळीबार घडवून आणल्याची कबुली दिली.
विशेष म्हणजे, निलेश घारे यांनीच आपल्याला हा गोळीबार करण्यास सांगितले असल्याचा धक्कादायक खुलासाही त्यांनी केला. या प्रकरणी संकेत मातले हा फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.