Video: "मला त्या व्यक्तिची पार्श्वभूमी माहीत नव्हती," गुंड गजा मारणेच्या भेटीवर निलेश लंकेंची प्रतिक्रिया

"त्यांनी चहा पिण्यासाठी चला म्हणून आग्रह केला. मी गडबड असल्यामुळं आधी नाही म्हणालो, परंतु..." , नेमकं काय म्हणाले निलेश लंके?
Video: "मला त्या व्यक्तिची पार्श्वभूमी माहीत नव्हती," गुंड गजा मारणेच्या भेटीवर निलेश लंकेंची प्रतिक्रिया
Published on

पुणे: कुख्यात गुंड गजा मारणे याची भेट घेतल्यामुळं अहमदनरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. गुरुवारी पुणे दौऱ्यावर असताना ते गजा मारणेच्या घरी गेले होते. या भेटीदरम्यान त्यांनी सत्कारही स्वीकारला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर निलेश लंके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गजा मारणे कोण, हे माहिती नव्हतं, असा दावा त्यांनी केला. ही भेट केवळ एक अपघात होता. त्यांचा आणि माझा काहीही संबंध नाही, असं स्पष्टीकरण निलेश लंके यांनी दिलं.

नेमकं काय म्हणाले निलेश लंके?

निलेश लंके यांनी गजा मारणेच्या भेटीबाबत एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "मी माझी दिल्लीतील कामं संपवून काल एअरपोर्टला (पुणे) आलो. माझ्या एका 'पवार' नावाच्या कार्यकर्त्याचा कॅन्सरनं मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी गेलो. तिथून त्याच परिसरातील प्रवीण धनवे नावाच्या कार्यकर्त्याच्या घरी गेलो. तिथून निघाल्यावर चार-सहा लोकांनी मला हात केला. आम्ही त्यांच्या दारावरूनच चाललो होतो. शेवटी आपण समाजकार्य करणारी माणसं आहोत, त्यामुळं कुणीही हात केलं की थांबावं लागतं. आम्हीही थांबलो. त्यानंतर त्यांनी चहा पिण्यासाठी चला म्हणून आग्रह केला. मी गडबड असल्यामुळं आधी नाही म्हणालो, परंतु जास्त आग्रह केल्यानंतर मी त्यांच्या घरी गेलो. त्यांनी माझा सत्कारही केला."

निलेश लंके पुढे म्हणाले की, "मला त्या व्यक्तिची पार्श्वभूमी माहीत नव्हती. तास-दोन तासानं पुण्यातील काही मित्रांचे मला फोन आले. तुम्ही तिथं गेला ते पूर्वनियोजित होतं का? असं त्यांनी विचारलं. सांत्वनपर भेटच फक्त नियोजित असल्याचं मी त्यांना सांगितलं. त्यानंतर त्यांनी मला या व्यक्तिच्या (गजा मारणेच्या) पार्श्वभूमीबद्दल सांगितलं. हा प्रसंग अपघातानं घडला. त्या व्यक्तीचा आणि माझा काहीही संबंध नाही. नकळत ती चूक घडली."

अमोल मिटकरींची निलेश लंकेंवर टीका-

गजा मारणेच्या भेटीवरून निलेश लंकेंवर टीका केली. ते म्हणाले की, "ज्यावेळी पार्थ पवार यांनी गजा मारणेची भेट घेतली, त्यानंतर एवढा गदारोळ माजवला होता. त्यानंतर अजितदादांनी स्पष्टीकरण दिलं होतं. आता निलेश लंकेंनी गजा मारणेचा सत्कार स्वीकारला. आता आम्हाला असा प्रश्न पडतोय की, बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये किंवा अहिल्यानगर मतदारसंघामध्ये ज्या घडामोडी घडल्या किंवा गुंडांचा वापर झाला, त्यात गजा मारणेचा त्यांना साथ होती का, हे तपासायला हवं."

logo
marathi.freepressjournal.in