

कराड : पाटण तालुक्यातील मल्हारपेठ परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी गेल्या दहा दिवसांत नऊ दुभत्या म्हैशींचा मृत्यू झाल्याने शेतकरी वर्गात खळबळ उडाली आहे. या म्हशींनी एका कंपनीचे पशुखाद्य खाल्ल्याने त्यातून विषबाधा झाल्याने सदर म्हैशींचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक संशय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासणीत व्यक्त करण्यात आला आले असून मृत म्हैशींच्या शवविच्छेदनात त्यांच्या शरीरातील नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यातआले आहेत. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल,असा निर्वाळा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे. मात्र 'संबंधित' कंपनीचे खाद्य जनावरांना न देण्याचे आवाहनहीखाद्य विक्रेते व पशुपालक शेतकऱ्यांना केले आहे.
गेल्या सलग दहा दिवसांत पाटण तालुक्यातील नाडे व बेलवडे या गावांतील नऊ दुभत्या म्हशींचा एकामागोमाग एक असा अचानक मृत्यू झाला.याबाबतची माहिती शेतकऱ्यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्यानंतर त्यांनी मृत म्हैशींचे शवविच्छेदन करून त्याचे काही नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.याचा तपासणी अहवाल अद्यापही प्राप्त झालेला नाही.मात्र गेल्या दोनच दिवसांत पुन्हा मल्हारपेठ येथील माजी उपसरपंच निलेश चव्हाण यांच्या म्हशीचा मृत्यू झाला.त्यामुळे पशुपालक शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी संबंधित पशुखाद्य निर्माती कंपनी व पशुवैद्यकीय विभागाच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
एकाच कंपनीचे होते पशुखाद्य
नाडे येथे एकाच दिवसात विष्णू पवार यांच्या तीन म्हशी,राजेंद्र पवार यांच्या दोन तर बेलवडेत तीन शेतकऱ्यांच्या प्रत्येकी एक अशा एकूण आठ म्हशींचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मल्हारपेठ येथील दिवसाला दहा लिटर दूध देणाऱ्या दुधाळ म्हशीचा मृत्यू झाला. दगावलेल्या सर्व म्हशींना दिलेले पशुखाद्य एकाच कंपनीचे असल्याचे वैद्यकीय तपासणीत समोर आले आहे.दगावलेल्यात सर्व म्हशी या दुभत्या होत्या,मात्र इतर म्हशींना हे खाद्य शेतकरी देत नसल्याने त्या सुदृढ असल्याने या खाद्यातूनच विषबाधा झाली असल्याचा संबंधित शेतकऱ्यांचा संशय आहे. मात्र 'संबंधित' कंपनीचे खाद्य जनावरांना न देण्याचे आवाहन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे तसेच संबंधित कंपनीचे हे खाद्य,विक्रेत्यानी विक्री न करण्याचे आदेश दिले आहेत.
मृत झालेल्या म्हशींचे शवविच्छेदन करण्यात आले असून त्यावेळी त्यांच्या शरीरातील काही नमुने ( अवयवाचे भाग,चारा,पाणी व पशुखाद्य) काढून घेण्यात येऊन ते तपासणीस पुणे येथे पाठवले आहे. त्याच्या अहवालानंतर याबाबतचे कारण स्पष्ट होईल; मात्र, सध्या तरी प्राथमिक निष्कर्षानुसार पशुखाद्यातील विषबाधेतून म्हशींचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज आहे.
डॉ. अविनाश पवार, पशुवैद्यकीय अधिकारी