जरांगेंच्या मेव्हण्यावर तडीपारीची कारवाई

जालन्यात वाळू माफिया आणि अट्टल गुन्हेगारांच्या विरोधात प्रशासनाने जोरदार कारवाई सुरू केली असून, नऊ आरोपींना जालनासह बीड, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांतून तडीपार करण्यात आले आहे.
जरांगेंच्या मेव्हण्यावर तडीपारीची कारवाई
Published on

जालना : जालन्यात वाळू माफिया आणि अट्टल गुन्हेगारांच्या विरोधात प्रशासनाने जोरदार कारवाई सुरू केली असून, नऊ आरोपींना जालनासह बीड, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांतून तडीपार करण्यात आले आहे. मनोज जरांगे यांचा मेव्हणा विलास खेडकर याच्यावरदेखील तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.

जरांगे यांच्या आंदोलनामध्ये सक्रिय असणाऱ्या जवळपास सहा आरोपींवर परभणी, जालना, बीड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांतून हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. संबंधित आरोपींवर वाळू चोरी, जीवे मारण्याचा प्रयत्न, अंतरवाली सराटीच्या आंदोलनात केलेली जाळपोळ यासह सरकारी कामात अडथळा आणण्याचे जालना जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत.

२०१९ पासून वेगवेगळ्या प्रकरणात हे गुन्हे दाखल आहेत. अंबड उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये ही तडीपारीची कारवाई करण्यात आली असून आणखी काही जणांवर अशीच कारवाई करण्याचा प्रस्ताव प्रलंबित असल्याचे समजते.

मनोज जरांगे यांचा मेव्हणा विलास खेडकरवर विविध गुन्हे दाखल असल्याने त्याला जालना, छत्रपती संभाजीनगर आणि परभणी या तीन जिल्ह्यातून उपविभागीय न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशाने तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.

विलास खेडकरवरील गुन्हे

जरांगेंचा मेव्हणा विलास खेडकरवर २०२१ मध्ये ट्रॅक्टरद्वारे अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. तसेच २०२३ मध्ये जालन्यातील शहागड इथे बस जाळल्याप्रकरणी ३०७, ३५३ आणि ४३५ या कलमान्वये गुन्हा, २०२३ मध्ये गोदावरी नदीतून ४ लाख ८१ हजार रुपयांची १०० ब्रास वाळू चोरीप्रकरणी गुन्हा, २०२३ रोजी पाथरवाला बुद्रुक येथे गोदावरीमधून केणीच्या साह्याने ५०० ब्रास वाळू चोरी केल्याप्रकरणी गोंदी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे.

या नऊ जणांवर कारवाई

तडीपारीची कारवाई झालेल्यांमध्ये विलास हरिभाऊ खेडकर, केशव माधव वायभट, संयोग मधुकर सोळुंके, गजानन गणपत सोळुंके, अमोल केशव पंडित, गोरख बबनराव कुरणकर, संदीप सुखदेव लोहकरे, रामदास मसूरराव तौर, वामन मसुरराव तौर या नऊ जणांचा समावेश आहे.

logo
marathi.freepressjournal.in