

नाशिक : ‘दैवी शक्तीच्या आधारे तुझ्या पत्नीच्या अंगातील भुताटकी आणि तिला झालेली करणी दूर करतो’, असे सांगून निफाड तालुक्यातील महेशगिरी नामक अन्य एका भोंदू बाबाने आपला प्रपंच उद्ध्वस्त केल्याची तक्रार बेलापूर ( जि. अहिल्यानगर ) येथील एका व्यक्तीने निफाड पोलिसांत केली आहे.
तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, पत्नीला मानसिक आजाराने पछाडले असल्याने आम्ही अनेक ठिकाणी उपचार करूनही ती बरी होत नव्हती. काही परिचितांनी, दैवी शक्ती प्राप्त असलेल्या भोंदू बाबाकडे नेल्यास प्रकृतीत निश्चित फरक पडेल, असा सल्ला दिला. त्यानुसार, पत्नीला घेऊन बाबाकडे गेलो. त्याने, पत्नीला करणी झाली असून तिला काही दिवस आश्रमात ठेवावे लागेल, असा सल्ला दिला. पत्नीसोबत माझ्या पंधरा वर्षांच्या मुलीलाही बाबाने आश्रमात ठेवून घेतले.
खेळ खल्लास करण्याचा बाबाने भरला दम
तथापि, गतवर्षी पत्नी आणि मुलीला आणण्याकरता गेलो असता बाबासोबत माझा वाद झाला. माझ्याकडे मंत्र आणि दैवी शक्ती आहे. तू इथून निघून गेला नाहीस तर तुझा खेळ खल्लास करून टाकेन, असा दम बाबाने भरला. मी माझ्या मुलीलाही घेवून निघालो असता बाबाने तिला नेण्यास हरकत घेतली. वाद टाळण्यासाठी मी मुलीला पुन्हा आश्रमात सोडले. बाबा विरोधात तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलो, मात्र, माझी तक्रार घेण्यात आली नाही.
कुटुंबियांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेतल्याचा आरोप
संबंधित बाबाने माझ्या पत्नीच्या अज्ञानाचा फायदा घेतला व दैवी शक्तीची भिती दाखवून माझा प्रपंच उद्ध्वस्त केला आहे. त्यामुळे त्याला शिक्षा व्हावी व मला न्याय मिळावा, अशी मागणी या व्यक्तीने केली आहे. बाबाने माझ्या कुटुंबियांच्या अज्ञाचा गैरफायदा घेतल्याचा आरोपही संबंधित तक्रारदाराने केला आहे.