
मुंबई : नितेश राणे आणि रोहित पवार या दोन नेत्यांमधील शाब्दिक कलगीतुरा याआधीही राज्यातील जनतेने पाहिला आहे. आता भाजप नेते नितेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यासंदर्भात केलेल्या दाव्यामुळे आता पुन्हा एकदा वादाला खतपाणी मिळाले आहे. “शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातील नेते रोहित पवार हे २०१९ सालीच भाजपमध्ये येणार होते, असा खळबळजनक दावा नितेश राणे यांनी केला आहे. रोहित पवार हे मनाने भाजपमध्येच आहेत, तर शरीराने शरद पवार यांच्यासोबत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
नितेश राणे म्हणाले की, “रोहित पवार हे २०१९मध्येच आमच्यामध्ये येणार होते. ते कुठल्या वेळी कोणत्या भाजपच्या नेत्यांना भेटतात, हे आम्ही बोलायला लागलो तर रोहित पवार यांना तोंड वाचवायला जागा राहणार नाही. रोहित पवार हे मनाने भाजपचे आहेत. शरीराने शरद पवार यांच्या पक्षात आहेत.”
दरम्यान, शशिकांत शिंदे यांची प्रदेशध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर रोहित पवार यांना ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ पक्षाच्या प्रदेश सरचिटणीसपदाची आणि पक्षाच्या फ्रंटल व सर्व सेलच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली.