नितेश राणेंवर चौफेर टीका; 'शिवरायांच्या सैन्यात मुस्लीम नव्हते' वक्तव्यावरुन वाद; अजित पवार, उदयनराजेंकडून कानउघाडणी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम नव्हतेच. स्वराज्याची लढाई हिंदू विरुद्ध मुसलमान अशीच होती, असे वादग्रस्त वक्तव्य मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केल्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.
नितेश राणे
नितेश राणे संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई/कराड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम नव्हतेच. स्वराज्याची लढाई हिंदू विरुद्ध मुसलमान अशीच होती, असे वादग्रस्त वक्तव्य मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केल्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज आणि भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी नितेश राणे यांची कानउघाडणी केली आहे. विशेष म्हणजे, विरोधकांऐवजी महायुतीतील नेत्यांनीच त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

“संभाजीराजे नसते तर आपल्या आडनावाच्या पुढे वेगळेच नाव लागले असते. औरंगजेबाला थांबविण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. शिवाजी महाराजांच्या सैन्यात कोणी मुसलमान नव्हते. हिंदू विरुद्ध मुसलमान अशीच लढाई होती. काही अतिशहाणे सांगतात, कधी महाराजांनी मस्जिद तोडली नाही. ज्यांनी ज्यांनी स्वराज्याकडे वाकड्या नजरेने पाहिले, त्यांना महाराजांनी धडा शिकवला. आज कडवट हिंदुत्ववादी सरकार राज्यात आहे,” असे नितेश राणे एका कार्यक्रमात म्हणाले होते.

महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री तथा देशाचे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या ११३ व्या जयंतीदिनी त्यांच्या कराडमधील समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर अजित पवार यांनी नितेश राणे यांचे कान टोचले. “इतिहास वाचला तर लक्षात येईल, शिवरायांसोबत मुस्लिम होते. महाराजांच्या बरोबर जे लोक होते, त्यामध्ये मुस्लिम लोकही होते. महाराजांचा दारूगोळा कोण सांभाळत होते? अशी कितीतरी उदाहरणे आपल्याला देता येतील. अलीकडे काही नेत्यांची विधाने सहन न होणारी, न परवडणारी आहेत. त्यामुळे विरोधक असो अथवा सत्तेतील व्यक्ती असो, त्यांनी कायदा आणि सुव्यस्थेचे भान राखावे. त्यामुळे त्यांनी असे वक्तव्य का केले आणि त्यामागे त्यांचा हेतू काय आहे, हे माहिती नाही. परंतु आपल्या देशाबाबत अभिमान बाळगणारे मुस्लिम बांधवही आहेत, ते देशप्रेमीच आहेत.”

“छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू-मुस्लिम असा भेदभाव कधीच केला नाही. शिवाजी महाराजांची सर्वधर्म समभाव ही संकल्पना होती. त्यांनी जर तसा भेदभाव केला असता तर आपण मुघलांच्या गुलामगिरीतच असतो. मी नितेश राणे यांचे वक्तव्य ऐकलेले नाही. कदाचित नितेश राणेंना औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण चाललंय, ते खोदून काढावे, असे म्हणायचे असेल,” असे उदयनराजे यांनी कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन केल्यानंतर सांगितले.

फडणवीसांनी मंत्र्यांना इतिहासाचे धडे द्यावेत -संजय राऊत

“मोदींची पिल्लावळ फाळणीची बीज रोवण्याचे काम करत आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळात कायकाय नग भरलेले आहेत, यावरून मला हसावे की रडावे हेच कळत नाही. औरंगजेबाच्या दरबारातसुद्धा हिंदू राजे होते. तसेच छत्रपतींच्या सैन्यात आणि त्यांच्या सभोवती अनेक मुस्लिम सरदार, योद्धे होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख कोण होता? किंवा शिवाजी महाराजांचे अंगरक्षक कोण होते? छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्वराज्यासाठी पहिली लढाई औरंगजेबाबरोबर नाही, तर चंद्रराव मोरेबरोबर केली, हा इतिहास आहे. माननीय देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सर्व मंत्र्यांना इतिहासाचे धडे हे योग्य इतिहास तज्ज्ञांकडून द्यावेत,” असा सल्ला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.

‘ते’ पुस्तक माझ्याकडूनवाचायचे राहिले - मुनगंटीवार

भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, “मी अधूनमधून पुस्तकं वाचतो, पण नितेश राणेंनी वाचलेले पुस्तक कदाचित माझ्याकडून वाचायचे राहून गेले असावे. कारण मी जे वाचले, त्यात शिवाजी महाराजांबरोबर काही मुस्लिम होते. एकही मुस्लिम नव्हता असे नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर लढणारे देशभक्त मुस्लिम होते.”

logo
marathi.freepressjournal.in