तृथीयपंथीयांच्या विधानावर नितेश राणे यांचं स्पष्टीकरण ; म्हणाले...

सुषमा अंधारे आणि ज्येष्ट विधिज्ञ असीम सरोदे यांनी राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून गुन्हा दाखल न केल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिलाय
तृथीयपंथीयांच्या विधानावर नितेश राणे यांचं स्पष्टीकरण ; म्हणाले...

ठाकरे गटाचे नेते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विदर्भ दौऱ्यादरम्यान नागपूर येथील सभेत बोललाना देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख 'नागपूरचा कलंक' असा केला होता. यावरुन भारतीय जनात पार्टीचे नेते तसेच पदाधिकाऱ्यांनी आक्रमक होत जागोजागी ठाकरे यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवत आंदोलन केलं होतं. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आलं होतं. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील उद्धव ठाकरे यांना दिला होता.

यावेळी उद्धव ठाकरे तसंच ठाकरे कुटुंबावर बोलण्याची एकही संधी न सोडणारे राणे कुटुंब त्यात विषेशत: आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली होती. यावेळी त्यांनी 'हे बघा हिजड्यांचे सरदार', असं वक्तव्य केलं होतं. नितेश राणे यांच्या या वक्तव्याविरोधात तृतीयपंथी आक्रमक झाले असून त्यांनी राज्यभर आंदोलन छेडले आहे. राणे यांच्या विधानाविरोधात मध्यरात्रीपासून पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या बाहेर तृतीयपंथी समाजाच्यावतीने रास्ता रोको करत आंदोलन करण्यात येत आहे.

यावेळी पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड सुरु करण्यात आली आहे. पोलीस प्रशासन सरकारच्या दबावाला बळी पडून नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत नसल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात येत आहे. तसंच जो पर्यंत आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीने आंदोलन सुरुच राहणार असल्याची भूमिका आंदोलक तृथीयपंथीयांनी घेतली होती. यावेळी तृथीयपंथीयांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आमदार नितेश राणे यांचा निषेध करताना रास्तारोको करणाऱ्या तृतीयपंथीय आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड करण्यात आली. यावेळी पोलीस आणि आंदोलक यांच्यात मोठा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले.

यावर आता आमदार नितेश राणे यांनी एका व्हिडिओच्या माध्यामातून स्पष्टीकरण दिलं आहे. तृतीयपंथीय समाजाने माझं संपूर्ण वक्तव्य ऐकलेलंच नाही, असं मला वाटत. असं म्हणत त्यांनी काँग्रेसमोर झुकणारे सगळे हिझडे असतात, असं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत बोलताना म्हटलं असल्याचं सांगितलं. त्या विधानाचे व्हिडिओ युट्यूबवर आहेत. त्यामुळेच, मी बाळासाहेबांच्या त्या विधानाचा संदर्भ देत हे विधान पत्रकार परिषदेत केलं. कारण उद्धव ठाकरे जे आता काँग्रेससमोर झुकले आहेत, २०१९ पासून झुकत आहेत, ते हिझड्यांचे प्रमुख आहेत, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि ज्येष्ट विधिज्ञ असीम सरोदे यांनीही या आंदोलनात सहभागी होत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसंच पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यास उच्च न्यायालयात जाऊ, असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in