इर्शाळवाडीत आधी मदत पोहचवणारे नितीन देसाई होते, पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गेंनी सांगितली आठवण

सोमनाथ घार्गे यांनी इर्शाळवाडी दुर्घटनेत अगदी क्षणाचाही विलंब न लावता नितीन देसाई यांनी मदत केली अशी माहिती दिली.
इर्शाळवाडीत आधी मदत पोहचवणारे नितीन देसाई होते, पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गेंनी सांगितली आठवण

काही दिवसांपूर्वी खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे दरड कोसळून ५७ जणांचा मृत्यू झाला होता. तर अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची शक्यता आहे. इर्शाळवाडी हा भाग दुर्गम असल्याने याठिकाणी यांत्रिक तसंच कोणतीही मदत पोहचवण जवळपास अशक्यप्राय गोष्ट होती. या कामात एनडीआरएपसह अनेकांनी मोलाची मदत पोहचवली. मात्र, या ठिकाणी सर्वात प्रथम मदत पोहचवली ती नितीन चंद्रकांत देसाई यांनी. मध्यरात्री नितीन देसाई यांना फोन केल्यानंतर अवघ्या १५ ते २० मिनीटात नितीन देसाई यांनी इर्शाळवाडीतील लोकांना मदत उपलब्ध करुन दिली, अशी माहिती समोर आली आहे.

सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी त्यांच्या एनडी स्टुडिओत आत्महत्या केली. त्यांच्या निधनानंतर कला क्षेत्रातून तसंच सामाजित आणि राजकीय क्षेत्रातून तीव्र शोक व्यक्त करण्यात येत आहे. नितीन देसाई यांच्या आत्महत्येबाबत संशय व्यक्त केला जात असून एनडी स्टु़डिओवरील कर्जाची सखोल चौकशी करण्याचं आश्वासन राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. एनडी स्टुडिओ येथे जाऊन अनेक अभिनेते, कलाकार, नेतेमंडळी, कलासृष्टीतील अनेकांनी नितीन देसाई यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी रायगडचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांची देखील उपस्थिती होती. यावेळी त्यांनी इर्शाळवाडी दुर्घटनेत अगदी क्षणाचाही विलंब न लावता नितीन देसाई यांनी मदत केली अशी माहिती दिली.

इर्शाळवाडी येथे दुर्घटना घडली त्यावेळी आम्ही तात्काळ तिथे पोहचलो. मुसळधार पावसात आम्ही गड चढत असताना वरुन माहिती आली की त्याठिकाणी खूप पाऊस असून थांबायला देखील जागा नाही. त्यावेळी अगदी तात्काळ मदत म्हणून टेन्ट्स किंवा निवारा हवा होता. त्यावेळी नितीन देसाई यांचं नाव सर्वप्रथम समोर आलं. कारण त्यांचा एनडी स्टुडिओ जवळ होता. रात्रीच्या दीड दोन वाजेची वेळ होती. त्यावेळी त्यांना फोन केला. त्यांना इर्शाळवाडीच्या दुर्देवी घटनेबाबत माहिती दिली आणि टेन्ट्स हवे असल्याचं सांगितलं. यावेळी देसाई यांनी क्षणाचा विलंब न करत सांगितलं की गडाखालून टेन्ट्स न्यायची व्यवस्था करा. काही वेळात टेन्ट्स गडाखाली पोहचतील. झालेही अगदी तसंच. २५ ते ३० मिनीटात टेन्ट्स गडाखाली पोहचले होते. सोमनाथ घार्गे यांनी या आठवणींना उजाळा दिला आहे.

logo
marathi.freepressjournal.in